नाशिक : प्रायोगिक रंगभूमी सध्या जागा, पैसा, वेळ अशा अनेक समस्यांमुळे संकटात सापडली असून, ही रंगभूमी वाचविण्यासाठी नाट्यवेड्या प्रेक्षकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असा सूर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात आयोजित परिसंवादात निघाला. मेळाव्यात ‘नाटक -काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवादात बोलताना लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांनी सांगितले. चांगली नाटके आपली शहरात व्हावीत असे वाटत असेल तर २००/४०० सजग प्रेक्षकांचा एक गट निर्माण झाला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. नाटक निर्मितीपासूनच्या कालखंडांचा त्यांनी आढावा घेतला व सध्या करमणुकीची वाढलेली साधने, लोकांच्या बदललेल्या आवडीनिवडी, सकाळ, रात्रीच्या नाटकांचा कमी झालेला प्रेक्षकवर्ग, नाटकांमधील हरवलेला वैविध्यपूर्णपणा, मालिका, चित्रपटात अडकलेले कलाकार यामुळे नाटक मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी सांगितले, नाटक बघायला येणारा प्रेक्षक नाटक संपल्यावर अंतर्मुख झाला पाहिजे. त्याच्या मनात वैचारिक क्रांती झाली पाहिजे, तरच व्यावसायिक रंगभूमी यशस्वी ठरून नाटक जगेल. कुठल्याही नाटकात सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ असले पाहिजे. मराठी नाटक हे कायम पुरोगामी राहिले असून लेखक, निर्मात्यांनी विचारप्रवण नाटकांची निर्मिती केली तर व्यावसायिक रंगभूमी टिकून राहील. नाटकांनी समाजात घडणाºया वाईट गोष्टींवर प्रहार केला पाहिजे. लोकजागृतीचे ते एक महत्त्वाचे माध्यम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाट्यवेड्या लोकांची चळवळ हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:18 AM