नाशिक- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपाचा खल सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समाविष्ट करून घेणार का? या विषयावर मात्र खासदार संजय राऊत यांनी वेगळेच उत्तर दिले आहे. देशाची लोकशाही वाचवण्याची सध्या गरज आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतःहून आम्हाला महाविकास आघाडीत घ्या असे म्हटले होते. त्यामुळे ज्या कोणाला लोकशाही वाचवायची असेल त्यांनी स्वतःहून पुढे यावे असे खासदार राऊत म्हणाले.
विशेष म्हणजे आज पासून दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांसाठी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांची संवाद साधला यावेळी त्यांनी आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतही टीका केली या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणसांना काय मिळणार असा प्रश्न त्यांनी केला शेतकऱ्यांना वीस पंचवीस रुपये नुकसान भरपाई चा धनादेश दिला जातो एकीकडे गॅस सिलिंडरचे दर वाढवून नंतर सिलेंडरचे हेच दर दोन रुपयांनी कमी केले जातात या पलीकडे काय मिळणार असा प्रश्न त्यांनी केला. दरम्यान, केंद्रातील भाजप सरकार देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.