नामपूर : राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी धुळे मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवण्याची मागणी केली.
गेल्या आठ दिवसांपासून कांदा बाजारभाव सातत्याने घसरत आहेत. शेतकरी वर्गाने ६ महिन्यांपासून साठवलेला कांदा खराब तर होतच होता, शिवाय शासनाच्या कांदा निर्यातबंदीमुळे मागच्या महिन्यात कांदा दर खाली आले. आता नवीन पोळ कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. देशात मागणी कमी आहे. अशा परिस्थितीत बंदी हटवून कांदा निर्यात सुरू केली नाही तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. कांदा पिकवत असताना शेतकऱ्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कांदा उत्पादन आता खर्चीक झाले आहे. बियाणे, रासायनिक खते, मजुरीचे दर, शेती तयार करायला लागणारे इंधनाचे दर शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. केंद्राच्या निर्यातीबाबत धरसोड धोरणाचा तो बळी ठरत आहे. असे असताना शासनाने कांद्याला जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी किरण मोरे, दिगंबर धोंडगे, पंकज बोरसे, हर्षल अहिरे, राजेंद्र सोनवणे, मिलिंदकुमार जाधव, संदीप बागुल आदी उपस्थित होते.
खासदार सुभाष भामरे यांनी, शेतकरी वर्गाची मागणी योग्य आहे व येत्या सोमवारी दिल्लीला जाऊन पीयूष गोयल व इतर मंत्रिवर्गाची भेट घेऊन ताबडतोब निर्यात खुली करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शेतकरी वर्गाला दिले.