नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे विजेची मागणी दरवर्षी एवढी नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र रहिवासी भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या नागरिकांची अवस्था बिकट होत चालली आहे. गेल्या काही वर्षात महावितरणच्या वतीने कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित होणार याचे एसएमएस पाठविले जात ते तर पाठविणे बंद झाले आहेच. परंतु तक्रारीसाठी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केल्यानंतर लॉकडाउनमुळे कर्मचारी कमी असल्याची कैफियत सांगून दिलगिरी व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्याच्या अखेरपासून शहर परिसरात ऊन वाढू लागले आहे. चालू महिन्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. गेल्या महिन्यात २३ मार्चपासून देशभरा लॉकडाउन असल्याने नागरिकांना घरातच रहावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळा जाणवत असताना गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.मध्यवर्ती कॉलेजरोड, शरणपूररोड भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो तर दुसºया अनेक भागात दिवसदिवस वीजपुरवठा खंडित होत असतो. परंतु तक्रार करणार कोणाकडे? असा प्रश्न निर्माण होतो. महावितरण कंपनीने दिलेल्या हेल्पलाइनवर फोन केल्यास अनेक सूचना केल्या जातात आणि त्यानंतरही लॉकडाउनमुळे कर्मचारी संख्या कमी असल्याने महावितरणच्या अॅपवर तक्रार करा, असे सांगून बोळवणूक केली जाते. यापूर्वी तक्रार केल्यास संबंधितांना पुन्हा कॉल करून फॉल्ट कुठे आहे आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होईल, असे सांगितले जात असे. मात्र आता अशी कोणतीही सुविधा नाही. गेल्या महिन्यात लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित केल्यानंतर उद्योगधंदे, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी दरवर्षी इतकी नाही. आताही शासन खासगी आणि शासकीय वीज केंद्रातून मुबलक वीज उपलब्ध असल्याचे सांगते आणि दुसरीकडे मात्र, भारनियमन नसतानाही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ऐन उन्हाळ्यात महावितरणचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 9:13 PM