लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वडाळा गावातील दाट लोकवस्तीच्या परिसरात अनेक व्यावसायिक विजेची चोरी करत असल्याची दखल घेत महावितरणच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी परिसरात झडती मोहीम राबवून तीन ठिकाणी होत असलेली वीजचोरी उघड केली. यावेळी संंबधितांवर कारवाई करण्यात आली.
महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक शहर विभाग-२ अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर शाखा क्षेत्रातील वडाळा भागात आज (गुरुवारी) महावितरणच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये तीन कारखाने व एक गोठा येथे अनधिकृतपणे केबल टाकून वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले.
नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली व नाशिक शहर विभाग २ चे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांच्या नेतृत्वाखाली वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी वीजचोरीविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सहा अतिरिक्त कार्यकारी अभियंता, एक उपकार्यकारी अभियंता, चौदा सहाय्यक अभियंता, लेखा विभागातील ७ कर्मचारी, मानव संसाधन विभागातील ७ कर्मचारी तसेच १८ जनमित्र सहभागी झाले होते. एकूण ७ वेगवेगळी पथके तयार करून या पथकांनी एकाचवेळी ७ विविध ठिकाणी छापे मारले.
नाशिक येथील वडाळा व विल्होळी येथील औद्योगिक वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वडाळा येथे एकूण ४ वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या. यामध्ये तीन कारखाने व एक गोठा येथे होत असलेली वीजचोरी उघडकीस आली. वीजचोरीचे एकूण युनिट्स व वीजचोरीचे बिल प्रणालीमध्ये तयार करण्याची प्रकिया सुरु आहे.
फोटो ओळ : वीजचोरी पकडल्यानंतर जप्त साहित्यासह अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली व कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे व पथकातील कर्मचारी.
(आर:फोटो:२१महावितरण)