नाशिक (सुयोग जोशी) : बाह्यरिंगरोडचे काम महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने (MSRDC) महापालिकेच्या पॅनलवरील सर्वेअर सुभाष जाधव यांच्याकडील काम थांबवत ते स्वत: रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाचे सर्वेक्षण करुन आराखडा सादर करणार आहेत. दरम्यान महिनाभरापासून पालिका स्तरावरुन काम सुरु असताना एमएसआरडीसीच्या कृतीने त्यांना पालिकेच्या कामकाजावर भरोसा नाही का, असा सवाल केला जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहराच्या बाजूने साठ किमीचा बाह्यरिंग साकारला जाणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या पॅनलवरील सर्वेअर सुभाष जाधव यांच्या देखरेखेखाली सर्वेक्षणाचे काम सुरु होते.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने बाह्यरिंगरोड महत्वाचा बिंदू आहे. शहरात दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. देशातीलच नव्हे तर जगभरातील भाविक शहरात शाही स्नानासाठी गर्दी करतात. त्यादुष्टीने पालिका प्रशासनाकडून प्रत्येकवेळी नियोजन केले जाते. यंदाच्या सिंहस्थातही पालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यासाठी तयारी आखली जात आहे. याचाच भाग म्हणून शहराच्या अवतीभोवतीला साठ किमी चा बाह्यरिंग रोड साकारला जाणार आहे. बाह्यरिंगरोडसाठी केल्या जाणाऱ्या भूसंपदनामुळे किती शेतकरी बाधित होणार, यासाठीचे सर्वेक्षणाचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आले आहे. भूसंपादनाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त टीडीआर देण्यात यावा असा प्रस्तावही नगररचाना विभागाने शासनाकडे पाठवला होता. महापालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने बाह्यरिंगरोडचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून हे काम होणार आहे. बाह्यरिंगरोडच्या रस्त्याची रूंदी ३६ व ६० मीटर इतकी असणार आहे. संपूर्ण रिंगरोडची रुंदी साठ मीटर एवढीच असावी. अशी मागणी केली जात होती. दरम्यान बाह्यरिंगरोडमुळे किती घरे व शेतजमिनी बाधित होतील यासाठी पालिका स्तरावरुन सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. तसेच भूसंपादन करताना शासनाने वाढीव टीडीआर द्यावा अशी मागणीही पालिकेने शासनाकडे केली होती. सिंहस्थांच्या कामांना गती देण्यासाठी मंत्रालयातून सूचना आल्यानंतर महापालिका प्रशासन कामाला लागला आहे. यामध्ये रिंगरोडचाही समावेश आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये बाह्यरिंगरोडसाठी केलेल्या सर्वेक्षणाची माहिती मिळ्णारच तोच एमएसाआरडीने हे काम थांबवत स्वत: सर्वेक्षण करणार आहे.
बाह्यरिंगरोडसाठी एमएसआरडीसी स्वत: सर्वेक्षण करणार आहे. यापूर्वी सुरु असलेले सर्वेक्षण थांबवण्यात आले आहे.-हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना विभाग, मनपा
प्रस्तावित बाह्यरिंग रोड या पद्धतीने होण्याची शक्यता
- नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंकरोड
- सातपूर-अंबड लिंक रोड
- गंगापूर-सातपूर लिंक रोड
- बिटको-विहीतगांव-देवळाली रोड