फांद्या छाटणीच्या कामाला वेग
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवरील तारांवर, विजेच्या खांबांपुढे आलेल्या झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. त्यासाठी मनपाच्या वतीने आवश्यकतेनुसार लहान-मोठ्या क्रेन्सचा वापर करण्यात येत आहे.
दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांमुळे अडथळा
नाशिक : दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांनी रस्त्यालगत लावलेल्या रांगा, छोटे-मोठे विक्रेते दुकाने लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडूनही रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने चारचाकी वाहने चालविताना वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मास्क विक्रीत पुन्हा घट
नाशिक : कोरोनाचे प्रमाण घटू लागल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर विक्रीच्या प्रमाणात पुन्हा घट होऊ लागली आहे. लस घेतलेल्या नागरिकांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने मास्कच्या विक्रीतही घट येऊ लागली आहे. मास्कचा वापर बंधनकारक असला तरी आता नवीन मास्कच्या विक्रीत काही प्रमाणात घट येऊ लागली आहे.
सखल भागात साचली तळी
नाशिक : शहरात सलग झालेल्या पावसामुळे पंचवटी, मध्य नाशिक, सारडा सर्कलनजीकच्या विविध सखल भागांत पाण्याची तळी साचली आहेत. अनेक ठिकाणच्या गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करण्यास नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
------