लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील करजंवण धरणातून पाणी सोडल्याने कादवा काठावरील गावाची पाणीटंचाई दूर झाल्याने ओझे, करजंवण, म्हेळुसके, लखमापूर, अवनखेड भागातील जनता सुखावली आहे.अनेक दिवसांपासून कादवा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे जनावरांचा व पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली होती. नदीकाठी असणाऱ्या विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठला होता. त्यामुळे काही गावामध्ये दिवसाआड किंवा दोन दिवसांनी पाणी सोडले जात होते. पालखेड उजव्या -डाव्या कालव्यातून शेतीसाठीही पाणी सोडले जाते. त्याचप्रमाणे पालखेड धरणातून अनेक गावांचे पाणी आरक्षित असल्यामुळे त्यांना पाणी सोडावे लागते. पालखेड धरणातील पाणीसाठा कमी होत चालला होता. त्यामुळे करजंवण धरणातून पालखेड धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालखेड उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी सोडण्यात आल्याची माहिती वाघाड कालवा उपअभियंता देवरे यांनी दिली.------------------------सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. हात धुण्यासाठी किंवा बाहेरून आल्यानंतर आंघोळीसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. तसेच या गोष्टीमुळे पाणी वापराचे गणित बºयाच गावांचे चुकले होते. परंतु आता कादवा नदीला पाणी सोडल्याने कादवा काठच्या गावामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.करजंवण धरणातून सोडलेले पाणी पालखेड समूहात जमा होऊन पुढे येवला, मनमाडला कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
कादवा काठ झाला ओला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 9:47 PM