पंचवटी : गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही बसला असून, तीन दिवसांपासून गंगाघाट परिसरातील मंदिरांत येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावल्याने मंदिरे ओस पडलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. गंगाघाट परिसरात गुरुवारच्या दिवशी रस्त्यावर गाळ व चिखलाचे साम्राज्य कायम असल्याने भाविकांना मंदिरांपर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीत दैनंदिन हजारो भाविक श्री कपालेश्वर मंदिर, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, नारोशंकर मंदिर, गंगा गोदावरी मंदिर, रामकुंड, तपोवन, सांडव्यावरची देवी मंदिरात येत असतात मात्र गेल्या मंगळवारी गोदावरीला पूर आल्याने परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली सापडलेली होती. पुरामुळे गंगाघाटाकडे येणारे सर्वच मार्ग बंद झालेले होते. गोदावरीचा पूर ओसरला तरी परिसरातील रस्त्यावर गाळाचे साम्राज्य कायम असल्याने व गंगाघाटावर असलेल्या वाहनतळावर वाहने येतच नसल्याने भाविकांना अडथळा निर्माण झाला आहे. याशिवाय नाशिकला आलेल्या पुराची माहिती सर्वत्र पोहचल्याने भाविकांनीही नाशिक दर्शनाकडे पाठ फिरविली आहे. ऐरवी भाविकांच्या वर्दळीने फुलणारे रस्ते व मंदिरे गेल्या दोन-तीन दिवसांपासून ओस पडलेली आहे. तपोवनात तर केवळ बोटावर मोजता येतील इतकेच भाविक फिरताना दिसले. रामकुंड तसेच परिसरातील देवदेवतांच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा असताना केवळ गोदावरीची पूरसदृश परिस्थिती व साचलेला गाळ यामुळे भाविकांना केवळ राममंदिर व सीतागुंफा येथे दर्शन करून माघारी फिरावे लागले आहे. (वार्ताहर)
मंदिरांना चिखलाचा वेढा
By admin | Published: August 05, 2016 1:42 AM