नाशिक : तोंडावर येऊन ठेपलेला सिंहस्थ कुंभमेळा व काही खात्यांची अजूनही सुरूच असलेली कुर्मगती पाहता, शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या उच्चाधिकारी समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लागला असून, येत्या सोमवारी या संदर्भात नागपूरला बैठक बोलविण्यात आली आहे. मंगळवारी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विविध खात्यांच्या कामांचा आढावा कुंभमेळा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी घेतला. प्रत्येक खात्याने गेल्या आठ दिवसांत केलेल्या कामाचा प्रगती अहवाल सादर करतानाच, त्यात येत असलेल्या अडचणींचा उहापोह करण्यात आला. येत्या सोमवारी १५ रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक होत असून, या बैठकीत आजवर झालेल्या कामांचा आढावा व प्रगतीची माहिती घेण्यात येणार आहे. ज्या कामांना अद्यापही शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे, त्याचबरोबर रेल्वेच्या कामांबाबत रेल्वे बोर्डाकडूनही विशेष प्रतिसाद मिळत नाही. रेल्वेच्या कामांवरच अन्य विभागाच्या कामांचे नियोजन अवलंबून असल्याने उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत रेल्वेच्या कामांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शासनाने आजवर सव्वाचारशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, नाशिक महापालिकेने सिंहस्थाच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर टक्के खर्च उचलावा अशी भूमिका घेतली असल्याने त्यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी सर्वच खात्यांचे मुख्य सचिव उपस्थित राहणार असल्याने कुंभमेळ्याशी संबंधित खात्यांनी आपल्या कामाचा प्रगती अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत कुंभमेळा कक्षाला सादर करावे अशा सूचनाही मंगळवारच्या बैठकीत देण्यात आल्या.
उच्चाधिकारी समितीच्या बैठकीला मुहूर्त कुंभमेळा : अहवाल सादर करण्याच्या सूचना
By admin | Published: December 10, 2014 1:51 AM