शनिवारी भुजबळ फार्म येथे टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनचा चांगला परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून, कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजार वेगाने वाढत आहे. हा आजार होऊ नये आणि झाला तर रुग्ण बरा करण्यासाठी काय करावे लागेल, असे दुहेरी नियोजन टास्क फोर्सने करावे. तसेच टास्क फोर्समार्फत येणाऱ्या सूचनांचा विचार करून या आजारावर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या आजाराशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा व औषधसामुग्री पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पोस्ट कोविडनंतर कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांची प्रतिकारशक्ती घटल्यामुळे आणि ज्यांना मधुमेह आहे अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी किंवा हा आजार झाला तर रुग्णाला बरे कसे करता येईल, यावर देखील या टास्क फोर्सने संशोधन करावे. यासाठी अजून तज्ज्ञांची आवश्यकता असल्यास त्यांचा देखील या टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात यावा, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, मनपा वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. आवेश पलोड, डॉ. संजय गांगुर्डे, विषय तज्ज्ञ व समिती सदस्य डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. पुष्कर लेले, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. मनीष बापये, डॉ. भारत त्रिवेदी उपस्थित होते.