येवला : गोदावरी एक्स्प्रेस कालव्यासाठी संपादित केलेल्या येवले तालुक्यातील मुखेड गावातील ४५ शेतकऱ्यांच्या जमिनीचा सुमारे १० ते १२ कोटी रु पयांचा वाढीव मोबदला, न्यायालयीन फेरीतून देण्याचे आदेश होऊनही, गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने अनुदान नसल्याचे कारण देऊन अडकवून ठेवला आहे. वाढीव मोबदल्याची रक्कम रखडल्याने नेमके आता काय करावे, या चिंतेत येथील शेतकरी आहेत. गोदावरी एक्स्प्रेस कालव्यासाठी येवला तालुक्यातील मुखेड गावातील ४५ शेतकऱ्यांची सुमारे १०० एकर जमीन या कालव्यासाठी संपादित करण्यात आली आहे. कालव्यासाठी जमीन गेली तेव्हा २७ हजार रु पये एकराने शेतकऱ्यांना दोन कोटी ७० लाख रु पये भरपाई मिळाली. वाढीव मोबदला मिळावा म्हणून प्रचलित बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यासाठी सन २००२ मध्ये निफाड न्यायालयात दावा दाखल केला. दरम्यान, न्यायालयाने आदेश देऊनही गोदावरी खोरे विकास महामंडळाने (औरंगाबाद) व्याजासह भरपाईची रक्कम अद्यापपर्यंत अदा केलेली नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, अशी मागणी प्रभाकर अहेर, मुकुंद कदम, नीळकंठ कदम, गुलाबराव अहेर, रमेश अहेर, भागवत गायकर, सिंधूबाई अहेर, शशिकला अहेर, शांता अहेर, बेबी देशमुख, मंजुळाबाई अहेर, वत्सला महाले आदि प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. (वार्ताहर)
मुखेड : मोबदल्याच्या प्रतीक्षेत शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2016 12:06 AM