नाशिक : नाशिक येथून अनेकदा मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र या प्रयत्नाला यश आले नाही. केंद्र सरकारने हवाई संपर्क बळकट करून विविध शहरांना जोडण्यासाठी आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी हवाई वाहतूक सेवा डोळ्यापुढे ठेवून उडान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत नाशिक-मुंबई-पुणे या शहरांसाठी विमानसेवेला मुहूर्त लाभला आहे.नाशिककरांचे विमानाने मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत जाण्याचे स्वप्न वारंवार भंगले. सर्वसामान्य नाशिककरांना या दोन्ही शहरांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे. विमानसेवेचे प्रयत्न अनेकदा झाले मात्र त्यांना फारसे यश आले नाही. केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेद्वारे येत्या २३ तारखेपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. सदर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे. नाशिक-पुणे-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो, मात्र नाशिक हे या दोन्ही शहरांपासून हवाई संपर्कापासून वंचित राहिले आहे. एअर डेक्कनमार्फत सुरू करण्यात येणा-या या हवाई सेवेच्या माध्यमातून नाशिककर गगनभरारी घेणार आहे. कंपनीच्या वतीने पहिल्या टप्प्यात नाशिक ते मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार असून, पुण्याला जाणारे प्रवासी व त्यांची विमानसेवेबाबतची मागणी लक्षात घेऊन नाशिक-पुणे विमानसेवेचा विचार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १९ प्रवाशांची क्षमता असलेले विमान नाशिक-मुंबई हवाई सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 5:42 PM
केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेद्वारे येत्या २३ तारखेपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. सदर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीमार्फत पुरविली जाणार आहे.
ठळक मुद्दे उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित १९ प्रवाशांची क्षमता असलेले विमान नाशिक-मुंबई हवाई सेवेसाठी उपलब्ध विमानसेवा एअर डेक्कन कंपनीमार्फत पुरविली जाणार प्रमुख सहा शहरांसोबत नाशिक ‘एअर कनेक्ट’ होणार