नाशिक : राजस्थानच्या कंजन समुदायाचा चकरी, गुजरातच्या राठव आदिवासींचा राठवा, तर आसामच्या बोडो आदिवासींचा बारदयी सिकला आणि महाराष्ट्राच्या नाशिकचा सोंगी मुखवटे यांसह सोळा राज्यांमधील लोककलेचा नृत्याविष्काराने नाशिककर रसिकांची मने जिंकली.निमित्त होते, तीन दिवसांपासून शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात सुरू असलेल्या आदिरंग महोत्सवाचे. भारताच्या सोळा राज्यांमधील लोकनृत्याचा अद्वितीय संगम नाशिककरांनी यानिमित्ताने अनुभवला. या अभूतपूर्व सोहळ्याची मणिपूरच्या ढोल-ढोलक चोलम या अनोख्या नृत्याविष्काराने झाली. उत्तम नियोजन, कोरिओग्राफी, वाद्यवृंद आणि सुसंगत असे निवेदनामुळे हा सांस्कृतिक मेळा रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळून गेला. राष्ट्रीय नाट्य विद्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या आदिरंगचे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिककरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरलेल्या या ऐतिहासिक आदिरंग महोत्सवाचा रविवारी (दि.३१) वरुणराजाच्या साक्षीने समारोप झाला. नाट्य विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे यांनी समारोपप्रसंगी नाशिकर जनतेचे सहकार्य आणि सांस्कृतिक प्रेमामुळे आदिरंग अमाप उत्साहात पार पडल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पी. के. मोहंती, अे. एन. रॉय उपस्थित होते. मान्यवरांचा कलावंतांनी सत्कार केला, तर निवेदक लईक हुसेन यांचा केंद्रे यांनी सन्मान केला.सोळा राज्यांतील तब्बल चारशेहून अधिक कलावंतांनी आपापल्या राज्यांमधील लोककलेचा आविष्कार गायकवाड सभागृहाच्या रंगमंचावरून नाशिककरांपुढे सादर केला. सलग तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाला नाशिककरांनीही उत्स्फूर्त, असा प्रतिसाद दिला. समारोपप्रसंगी संपूर्ण सभागृह रसिकांनी हाऊसफुल्ल झाले होते.
बहुरंगी नृत्याविष्कार‘
By admin | Published: August 01, 2016 12:49 AM