नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोरोना साथीचा फैलाव वाढला असला तरी, मुंबई ते दिल्ली दरम्यानची रेल्वे व विमानसेवा स्थगित करण्याचा विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सर्व बंधने पाळून या दोन्ही सेवा यापुढेही सुरूच राहाणार आहेत.
या दोन शहरांमधील रेल्वे, विमानसेवा स्थगित करण्याचा विचार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकल्या होत्या. त्याबद्दल केंद्र सरकारने सांगितले की, मुंबई-दिल्ली दरम्यानची रेल्वे व विमानसेवा स्थगित करण्याचा विचार नाही. साथीच्या पहिल्या लाटेमध्ये देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय विमानसेवा तसेच रेल्वेसेवा काही काळासाठी स्थगित केली होती. नंतर रेल्वेसेवा तसेच देशांतर्गत विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत भारत व अन्य देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा सुरू आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित स्वरुपात अद्याप सुरू केलेली नाही.