इच्छुकांच्या नजरा लागल्या मुंबईकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 01:06 AM2019-09-30T01:06:16+5:302019-09-30T01:06:48+5:30
कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.
नाशिक : कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असताना सर्वाधिक चुरस सेना-भाजपमध्ये असल्याने नाशिककरांच्या नजरा मुंबईतून होणाऱ्या घोषणेकडे लागले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे पाचच दिवस राहिल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत भाजप आणि सेनेने काही निकष निश्चित केले असल्याने या निकषात बसणाऱ्यांनाच उमेदवारी मिळणार असल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. क्षणाक्षणाला बदलणाºया राजकीय परिस्थितीवर दोन्ही पक्षांकडून भूमिका घेतली जात असल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सेना-भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना सद्यस्थितीत कोणतीही शाश्वती देता येणे शक्य नसल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांनासून नाशिकमधील अनेक इच्छुक मुंबईत तळ ठोकून असून, आपापल्या राजकीय संपर्काचा वापर करीत तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.
त्या तुलनेत कॉँग्रेस आघाडीच्या इच्छुकांमध्ये चुरस कमी असल्यामुळे तिकिटासाठी ठराविक नावांपैकीच नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. काहींना शब्दही देण्यात आल्यामुळे त्यांच्या नावाची केवळ अधिकृत घोषणा होण्याचे बाकी आहे. आघाडीची पहिली यादी रात्री उशिरा जाहीर होणार असल्यामुळे पहिल्या यादीत कुणाचे नाव असू शकेल याकडे नाशिककरांचे लक्ष असणार आहे. जिल्ह्यातील ज्या जागांच्या अदलाबदलीची चर्चा आहे, त्या जागांकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबईत रविवारी मनसेच्या कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नाशिकमधील नावांच्या बाबतीतील उत्सुकताही ताणली गेली आहे.
वंचित आघाडीसह अन्य राजकीय पक्षांनीदेखील काही नावे निश्चित केली आहेत. या पक्षाच्या इच्छुक उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी अर्जदेखील नेले आहेत. त्यामुळे वंचितच्या उमेदवारीविषयी फारसा सस्पेन्स नसला तरी ऐनवेळी इनकमिंग झाले तर नावात बदल होतो का एवढीच काय ती उत्सूकता आहे. मनसेचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. काही नावे चर्चेत असली तरी अंतिमक्षणी कोणते नाव समोर येणार याबाबतची उत्सुकता नक्कीच आहे.