नाशिक : येथील अंध युवक सागर बोडके याने ‘टँडम’ सायकलवर अन्य सायकलस्वारासोबत मुंबई ते नाशिक अशी स्वारी करीत ध्येय निश्चित केल्यास कोणताही अडथळा पार करता येतो, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. ब्रह्मगिरी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे संरक्षण करावे, असा पर्यावरण संवर्धनाचा संदेशदेखील सागर याने या सायकलफेरीतून नागरिकांना दिला.
नाशिकच्या सागर या ७० टक्के अंध युवकाने नुकताच ‘टँडम’ या दोन चालकांनी चालवल्या जाणाऱ्या सायकलवरून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून सकाळी ५ वाजता प्रारंभ करीत सायंकाळी ६ वाजता नाशिकच्या मुंबई नाका सर्कल आणि तिथून हुतात्मा स्मारकात पोहोचला. १३ तासांच्या या स्वारीपैकी मुंबई ते घोटी या अंतरासाठी सागरला मुंबईचा सायकलपटू शैलेश खडताळे याने साथ दिली, तर घोटीपासून नाशिकपर्यंत नाशिकचा सायकलपटू अविनाश क्षीरसागर यांनी त्याला साथसंगत केली. निसर्गाचे आणि विशेषत्वे सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे संरक्षण झाले नाही, तर निसर्गाकडून फटका बसेल. त्यामुळे असे काही घडण्यापूर्वीच निसर्ग वाचवूया, असा संदेशदेखील सागर याने या सायकलफेरीतून दिला. गरुडझेप प्रतिष्ठानच्या वतीने संघटनेचा सभासद असलेल्या सागरचे स्वागत संदीप भानोसे आणि अन्य सहकाऱ्यांकडून हुतात्मा स्मारकात करण्यात आले.
इन्फो
तब्बल २१ वेळा कळसूबाई सर
सागर याने आतापर्यंत तब्बल २१ वेळा अन्य सहकाऱ्यांसमवेत कळसूबाई शिखर सर केले आहे. ७० टक्के अंध असूनही ही कामगिरी बजावल्याने त्याच्या या विक्रमाचीही नोंद झाली आहे. त्याशिवाय लिंगाणा किल्लादेखील सागरने अन्य सहकाऱ्यांसमवेत सर केला आहे.
इन्फो
काश्मीर ते कन्याकुमारी करण्याचा मानस असून, मी यापूर्वी टँडम सायकलवरच नाशिक ते पंढरपूर ही ४८० किलोमीटरची सायकलवारी, कल्याण ते पाली ही ३५० किमीची फेरी अशा फेऱ्या केल्या आहेत. मुंबई ते नाशिक या सायकलफेरीत पावसामुळे खूप समस्या निर्माण झाली असतानाही मनातील जिद्द कमी पडू दिली नाही. भविष्यातही काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करण्याचा मानस आहे.
सागर बोडके, अंध सायकलपटू
फोटो २९ सागर स्वारी