नाशिक : वणी येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून खासगी मारुती इर्टिगा कारने मुंबईकडे परतत असताना वाडीवऱ्हे जवळ मुंबई-नाशिकमहामार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात कारची समोरील बाजु चक्काचूर झाली. या अपघातात मुंब्रा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक पांडुरंग चिंतामण खांडवी यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तसेच त्यांच्या पत्नीसह मुलगा, मुलगी आणि कारचालक जखमी झालाआहे. जखमींवर शहरातील मुंबईनाका भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मुंब्रा पोलीस ठाण्यात नोकरीस असलेले व मुळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथील रहिवासी असलेले पांडुरंग खांडवी हे वणी येथील एका नातेवाईकाच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावून मुंब्राच्यादिशेने खासगी कारने (एम.एच०२ डी.डब्ल्यू ७०६६) कुटुंबियांसह प्रवास करत होते. दरम्यान, वाडीवऱ्हेजवळील रायगडनगर येथे महामार्गाच्या नाशिक-मुंबई लेन वर रविवारी (दि.१४) रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या (एमपी०९ एचएच ३७१७) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटून कार ट्रकला धडकल्याचे वाडीवऱ्हे पोलिसांनी सांगितले. यावेळी कारमध्ये चालकासह एकुण पाच ते सहा प्रवाशी होते.
यावेळी घटनेची माहिती मिळताच घोटी महामार्ग पोलीसांसह वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या गोंदेफाटा येथील रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग खांडवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. अपघातात मिना पांडुरंग खाडवी (४०), वैष्णवी पांडुरंग खांडवी (१५), जय पांडुरंग खांडवी (१२, सर्व. रा. कादरी मेन्शन, क्वार्टर, माहिम पोलीस वसाहत, मुंबई) आणि कारचालक विनायक रघुनाथ सानप (२०,रा.मुंब्रा) हे जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने या चौघांचे प्राण वाचले. मुंब्रा पोलीस ठाण्यातील प्रशासन विभाागात पोलीस निरिक्षक म्हणून खांडवी मागील चार ते पाच वर्षांपासून कर्तव्यावर होते. ते मुळचे सुरगाणा येथील रहिवासी असून त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या अपघाती निधनाने मुंब्रा पोलीस दलात शोककळा पसरली असून उपायुक्त ए.एम.अंबुरे, सहायक आयुक्त सुनील घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी दु:ख व्यक्त केले आहे. --