नाशिक : ग्रामीण भागातील गावे आमदार, खासदारांनी दत्तक घ्यावीत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील आमदारांनी त्यांच्या शहरी मतदारसंघातील विकास करण्याबरोबरच ग्रामीण भागातील विकासावरही लक्ष दिले असून, देवळा तालुक्यातील तीन गावे शहरातील आमदारांनी दत्तक घेतल्याचे वृत्त आहे.दत्तक घेतलेल्या गावांमध्ये नन्हावे, नांदूरटेक, पिंपळगाव वाखारी या गावांचा समावेश असून, स्थानिक आमदार डॉ. राहुल अहेर यांनी त्यांच्या मतदारसंघातील खुंटेवाडी हे गाव दत्तक घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील बहुतांश आमदारांनी प्रत्येक वर्षाला एक गाव दत्तक घेऊन तेथे मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विडा उचलला आहे. मुंबई उपनगरातील सायनचे आमदार आर. सेल्वन यांनी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या मतदारसंघातील नांदूरटेक हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या आमदार निधीतून ५० लाखांचा निधी शाळा, दवाखाने दुरुस्तीसह भूमिगत गटारे व अन्य विकासकामांसाठी वर्षभरात खर्च करण्याचा संकल्प केला आहे. तीच बाब विलेपार्लेचे आमदार पराग अडवाणी यांनीही देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी हे गाव दत्तक घेतले आहे. तसेच नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी चांदवड तालुक्यातील नन्हावे हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असून, हे सर्व आमदार त्यांच्या आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाखांचा निधी मूलभूत सुविधांसाठी खर्च करणार आहेत. तसेच स्थानिक देवळा-चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी देवळा तालुक्यातील खुंटेवाडी हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असून, गावातील प्राथमिक व मूलभूत गरजांवर आमदार निधी ते खर्च करणार असल्याचे समजते. येत्या पाच वर्षांत देवळा व चांदवड या तालुक्यांतील किमान १०० गावे दत्तक देऊन त्या गावांचा विकास करण्याचा मानस असल्याचे आमदार डॉ. राहुल अहेर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
मुंबईच्या आमदारांनी घेतली गावे ‘दत्तक
By admin | Published: December 15, 2015 11:24 PM