नाशिक : येथील महर्षी चित्रपट संस्थेच्या वतीने आयोजित महर्षी लघुपट स्पर्धेत मुंबईच्या ‘पॉवर आॅफ ई’ या चित्रपटाने प्रथम क्रमांक मिळवीत बाजी मारली. स्पर्धेत द्वितीय क्र मांक ‘जरुरत’ने तर ‘सोनू वन थिंग’ ने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक ‘आनंदयात्री’ व ‘मैने कहा था ना!’ या लघुपटांनी मिळवले. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून ‘दुर्गी’ व ‘बूट’ या लघुपटातील कलाकारांना तर ‘ज्येष्ठ नागरिक कलाकार पुरस्कार ‘शांताबाई’लघुपटातील कलाकारांना मिळाला. ‘प्रॉन्झ’ लघुपटाला उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला. मंगळवारी (दि.२९) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री दीपाली सैयद, अभिनेता दीपक शिर्के, रवींद्र बगाडे, रमेश तलवारे, दिनकर पांडे, योगेश बर्वे, बाळासाहेब गोºहे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रादेशिक परिवहनचे भरत कळसकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यातील ८५ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून आपले आयुष्य सुरक्षित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अभिनेते दीपक शिर्के यांनी सांगितले की, लक्ष्मी येते, जाते पण सरस्वती टिकून राहते. त्यामुळे कलेची उपासना आवर्जुन करावी. ती मोठे समाधान मिळवून देते असेही त्यांनी अधोरेखित केले, तर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चांगल्यातले चांगले पोहोचवण्याचे साधन म्हणजे चित्रपट असून, त्याचा युवापिढी चांगला ध्यास घेत आहे. तो ध्यास सातत्याने टिकवून ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गणेश वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. तुषार गुप्ते, प्रमोद नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. निशिकांत पगारे यांनी प्रास्ताविक केले. अरुण इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास लघुपट निर्माते, दिग्दर्शक आदी उपस्थित होते.
मुंबईच्या ‘पॉवर आॅफ ई’ने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:43 AM