नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली करवाढ ही एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचा आक्षेप महासभेत घेण्यात आल्यानंतर आता त्यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम झाल्यास तोही वादात सापडण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक सुरू असताना अशाप्रकारे सत्ताधिकारी पक्षाच्या धोरणांना हा पुढे नेणारा उपक्रम असल्याने तोतातडीने रद्द करावा, अशी मागणी मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सध्या विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अशावेळी मुंढे यांचा कार्यक्रम सत्ताधिकारी पक्षाच्या धोरणांना पुढे नेणारा ठरणारा आहे. या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटना किंवा राजकीय संघटना, पक्ष कार्यकर्ते आयुक्तांना निवेदने देतील आणि त्यांच्या काही प्रश्नांचे निराकरण झाले तर नाशिक महापालिकेतील सत्ताधिकारी पक्षाला त्याचा फायदा होऊ शकणार आहे. हा कार्यक्रम नाशिकच्या मतदार लोकप्रतिनिधींना प्रभावित करण्यासाठी घेतला जात असल्याचा संशय भवर यांनी पत्रात व्यक्त केला आहे. तसेच आचारसंहिता सुरू असताना हा कार्यक्रम जाणीवपूर्वक घेतला जात असून, अशाप्रकारचे कार्यक्रम मनपाला घेता येतात का, कार्यक्रमास येणारा खर्च मनपाच्या तिजोरीतून करता येईल काय आणि त्याबाबत खुलासा करावा तसेच आयुक्तांचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी भंवर यांनी केली आहे.आयुक्तांनी यापूर्वी ३१ मार्च रोजी जमिनींचे करमूल्य घोषित केल्याने हा विषय वादग्रस्त ठरला असून, त्यावेळी एका प्रभागाची पोटनिवडणूक असताना त्यांनी घेतलेला निर्णय अडचणीचा ठरला आहे. यासंदर्भात महासभा जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्याच्या तयारीत असतानाच ‘वॉक विथ कमिशनर’वरदेखील आक्षेप घेण्यात आला आहे.
मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:59 AM