सिडको : येथील तुळजा भवानी चौक परिसरात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याबाबत आज ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मनपा प्रशासन खडबडून जागी झाली. आज सकाळपासून मनपाच्या वतीने परिसरात धूर तसेच औषध फवारणी करण्यात आली. तसेच परिसरात साफसफाई करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मनपाच्या गलथान कारभारामुळे सिडकोसह परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही याबाबत मनपाचा मलेरिया तसेच आरोग्य विभाग मात्र सुस्तावलेलाच दिसत होता. यातच तुळजाभवानी चौकात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक रूग्ण आढळल्याने नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत शिवसेना नगरसेवक कल्पना पांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे यांनी शुक्रवारी (दि. २७) सकाळी या संपूर्ण भागात फिरून रूग्णांची पाहणी केली तसेच मनपाच्या संबंधित विभागासही याबाबत धारेवर धरले. आज मनपाचा मलेरिया विभागाच्या वतीने संपूर्ण भागात धूर तसेच औषध फवारणी करून नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराबाबत प्रबोधन केले.
अन् मनपा प्रशासन खडबडून जागे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:29 PM