नाशिक : कामाची अनामत रक्कम परत देण्यासाठी ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेतील बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आलेला लिपिक शेखर कावळे यास प्रशासनाने निलंबित केले आहे. आडगावच्या मुस्लीम कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेके दाराकडून निविदेमधील रकमेच्या दोन टक्क्यांप्रमाणे तीस हजार रुपयांची मागणी कावळे याने केली होती. तडजोडीनंतर वीस हजार रुपये प्रथम देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर ठेकेदाराने काळेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी (दि.१४) ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची रोख रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात स्वीकारताना कावळे यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. न्यायालयाने कावळे यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कावळेबाबतचा पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सोमवारी त्याच्या निलंबनाचे आदेश काढले. दरम्यान, कावळे याची नाशिकरोडला घरपट्टी विभागात बदली झालेली असताना तो मुख्यालयात बांधकाम विभागात कोणाच्या आदेशान्वये काम करत होता, याची चौकशी आता केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
मनपाचा लाचखोर लिपिक निलंबित
By admin | Published: July 19, 2016 1:04 AM