नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी निविदांची कार्यवाही संपली असली तरी अद्याप करारच न केल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे. कराराचे प्रारूप विधी विभागाकडून संमत करून त्यानंतर यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु कराराचे काम प्राथमिक स्तरावर आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतुकीचा गेल्यावर्षी ठराव करण्यात आला. त्यानंतर बससेवेसाठी अनेकदा निविदा मागविण्यात आल्या परंतु त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने हा विषय रेंगाळत होता. मात्र, अखेरीस निविदांना प्रतिसाद मिळाला. महापालिकेने इलेक्ट्रिक बस दीडशे, दोनशे सीएनजी बस आणि पन्नास डिजेल बसची सेवा देण्याचे निश्चित करण्यात आले. आदर्श आचारसंहितेच्या आधीच स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत निविदांना मंजुरी देण्यात आली. परंतु निवडणूक कालावधीत सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला, आता आचारसंहिता संपली असली तरी अद्याप महापालिका आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यात करार झालेला नाही.महापालिकेने दहा वर्षांसाठी ग्रास रुट कॉँट्रॅक्ट पद्धतीने ठेका देण्याचे ठरविले असल्याने यासंदर्भात विचारपूर्वक करार करण्यात येणार आहे. त्यानंतर हा करार विधी विभागामार्फत संमत करून घेतला जाईल त्यानंतर संंबंधित ठेकेदार कंपनीस दिल्यानंतर ती कंपनी त्यांच्या विधी सल्लागाराकडून करार तपासून घेईल त्यानंतर करार केला जाईल.करारानंतर संबंधित कंपनीला दोन महिन्यांत पन्नास बस महापालिकेकडे सोपवाव्या लागणार आहेत. त्यामुळे करार झाल्यास किमान जानेवारी महिन्यात बस येण्यास प्रारंभ होईल, असा अंदाज आहे.निविदा काढूनही प्रतिसाद नाहीमहापालिकेने बससेवा निश्चित केली असली तरी वाहक आणि अन्य कर्मचारी पुरविणे, बस कंपनीच्या कामावर देखरेख ठेवणे यांसह अन्य अनेक विषय मात्र प्रलंबित आहेत. काही कामांना निविदा काढून प्रतिसाद मिळत नसल्याने ही कामे रखडली आहेत.
महापालिकेच्या बससेवेचा करार रखडलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:12 AM