नाशिक : महानगरपालिकेची बहुचर्चित सिटी लिंक शहर बससेवा १ ते १० जुलैदरम्यान सुरू करण्याचा निर्णय नाशिक मनपा परिवहन महामंडळ कंपनीच्या बैठकीत गुरुवारी (दि. २४) घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बससेवेचा मुहूर्त गुलदस्त्यात राहिला आहे.
महापालिकेच्या बससेवेची पूर्वतयारी जवळपास पूर्ण होत आली असून, नुकतीच ट्रायल रनदेखील घेण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.२४) संचालक मंडळाच्या बैठकीत पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, सभागृहनेते कमलेश बोडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते अरुण पवार, शहर अभियंता संजय घुगे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बससेवेचे टर्मिनल बांधणे, आयटीएमएस यंत्रणा, बसचालक व वाहक यांची सज्जता या आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंजूर बस दरांची माहिती यावेळी देण्यात आली. बससेवेसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नऊ मार्गास मान्यता दिली आहे. त्यात बदल करणे अथवा नवीन मार्ग निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणास आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. शहरातील नऊ मार्गांवर बस धावणार असून, २४० बसथांबे असणार आहेत.
या बैठकीत कंपनीच्या संचालकपदी सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच एसटीचे विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंपनीसाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी यांची शासनाकडून नियुक्ती करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कंपनीचे मुख्य लेखाधिकारी म्हणून मनपाचे उपमुख्य लेखाधिकारी गुलाबराव गावीत यांची तात्पुरती स्वरूपात नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीत लेखापरीक्षक यांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.
मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखापरीक्षक बी. जे. सोनकांबळे, अधीक्षक अभियंता एस.एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, बाजीराव माळी, एसटीचे अधिकारी मिलिंद बंड, वसंत गायधनी, राजेश वाघ, रणजित ढाकणे, मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखापरीक्षक बी.जे. सोनकांबळे, अधीक्षक अभियंता एस.एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, बाजीराव माळी, एसटीचे अधिकारी मिलिंद बंड, वसंत गायधनी, राजेश वाघ, रणजित ढाकणे उपस्थित होते.
इन्फो..
बसथांब्याजवळ रिफ्रेशमेंट सेंटर
महापालिकेने बससेवा सुरू करतानाच ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी उपाय सुरू केले आहेत. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने त्या थांब्याजवळ रिफ्रेशमेंट सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.