नाशिकरोड : नाशिक महानगर पालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना रविवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मुक्तिधाममधील भक्त निवासाची पाहणी केली. शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भविष्यात रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास त्या रुग्णांची व्यवस्था मनपाच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली असून त्यामध्ये असणारे बेड कमी पडल्यास भविष्यातील उपाययोजना म्हणून मुक्तिधाममधील गोवर्धन भक्त निवास, आयोध्या भवन व गोकूळ भवन या तीन इमारतींची पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी महापालिकेस आवश्यकता भासेल, त्यावेळी रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने या इमारतीमध्ये व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजनाच्या सूचना संबंधित विभागास आयुक्त जाधव यांनी दिल्या. यावेळी आयुक्तांसमवेत कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर, उपअभियंता नीलेश साळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी पाहणीनंतर मुक्तिधामचे ट्रस्टी नटवरलाल चव्हाण व जगदीश चव्हाण यांच्याशी चर्चा केली.
फोटो
२१ आयुक्त पाहणी