लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : मखमलाबाद नाका परिसरात राहणाऱ्या मनपा सफाई कामगार अरुण अशोक बर्वे याच्या खुनाचे गूढ उकलण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी क्रांतिनगरमधील एका संशयितास ताब्यात घेतले आहे. बर्वे याचा खून लुटमारीच्या उद्देशातून झाल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. रामवाडी परिसरातील कोशिरे मळ्यासमोरील गोदावरी नदीपात्रात अज्ञात मारेकऱ्यांनी बर्वे याचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याचे बुधवारी (दि़३१) उघडकीस आले होते़ बर्वे याचा खून करून मृतदेह पाण्यात फेकल्याची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता बर्वे याच्या पाठीवर, डोक्यात शस्त्राने वार करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून नदीपात्रात फेकल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले़ मृतदेहापासून शंभर ते सव्वाशे फूट अंतरावर पोलिसांना अर्धवट जळालेला चष्मा, मोबाइल की-पॅड व रक्ताचे डाग असलेले दगड, माती मिळून आली होती. मयत बर्वे यांचा हॉटेल व्यवसाय असल्याने आर्थिक व्यवहारातून खून करण्यात आला असावा या शक्यतेतून पोलिसांनी तपास सुरू केला होता़ मात्र संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर हा खून लूटमारीच्या उद्देशाने करण्यात आला नसेल कशावरून या दृष्टिकोनातून तपास सुरू केला़ या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी क्रांतिनगर परिसरातील संशयित कृष्णा चांदवडकर या संशयितास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली़ पेठरोडवरील सराईत गुन्हेगार वैभव ऊर्फ विकी दत्तात्रय काळे व कृष्णा चांदवडकर या दोघांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास मयत बर्वे हा रामवाडी पुलावर भ्रमणध्वनीवर बोलत असताना संशयितांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून अडविले़ यानंतर बर्वे यांच्या दुचाकीवरून कोशिरे मळा परिसरातील मोकळ्या झाडीझुडपात नेत तेथे मारहाण व धारदार शस्त्राने पोटावर, पाठीवर, डोक्यात वार करून जिवे ठार मारले व नंतर मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची माहिती दिली़ दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित काळे हा बर्वे यांची दुचाकी घेऊन फरार झाला असून, शोध सुरू आहे.
महापालिका कर्मचाऱ्याच्या खुनाचे गूढ उकलले
By admin | Published: June 03, 2017 1:17 AM