नाशिक : राज्य शासनाच्या वनमहोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेला घालून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, एकूण १७ हजार ४३१ झाडे लावण्यात आली आहेत, असा दावा करून शासनाकडून प्रशासनाने पाठ थोपटून घेतली असली तरी मुळातच यात गोेंधळ असून आयुक्तांनी बारा हजार झाडे लावण्यासाठी मागविलेल्या निविदानुरूप काम पूर्ण न झाल्याने त्यात गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात अमृत योजनेअंतर्गत तवली फाट्यावर लावलेली ११ झाडे आत्ताच लावल्याचे दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या वतीने यंदाच्या वनमहोत्सवात १३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने विविध शासकीय यंत्रणांना १ ते ३१ जुलैपर्यंत वृक्षलागवड करण्याचे आणि उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन केले होते. नाशिक महापालिकेला सुरुवातीला १२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महापालिकेने सुमारे तीन कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. स्थायी समितीत या निविदा मंजूर करण्यावरून बरीच चर्चा झाली होती.रानमाळा पॅटर्नचा वापरपुण्यात रानमाळा येथे लोकसहभागातून वृक्षलागवड करण्यात आली आहे. तसाच प्रयोग नाशिकमध्ये करण्यात आला असून, त्या माध्यमातून ३ हजार ५५६ झाडे लावण्यात आली आहेत. तवली फाट्यावरील ती झाडे उन्हाळ्यात लावण्यात आली होती. त्यातील अनेक रोपे पुरेशा पाण्याअभावी मृत झाली. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदारामार्फत जळालेल्या झाडांच्या जागी नवीन रोपे लावली होती हे विशेष होय.उद्दिष्ट वाढविलेसंबंधित ठेकेदाराने आत्तापर्यंत १२ हजार ४३२ खड्डे खोदण्याची उद्दिष्टपूर्ती केली असून आत्तापर्यंत केवळ २ हजार८७५ रोपे लावली आहेत. दरम्यानच्या काळात महापालिकेला उद्दिष्ट वाढवून १७ हजार करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने चक्क मे महिन्यात अमृत योजनेअंतर्गत तवली फाटा येथे उद्यानात लावलेली झाडेच या उद्दिष्टपूर्तीसाठी उसनी घेतली.
वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिकेची उसनवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:58 AM