नाशिक : महापालिकेने गणेशवाडी येथे सुमारे ६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भाजीमंडईमधील ४६८ पैकी १५२ ओट्यांसाठी लिलावप्रक्रिया पूर्ण करून पाच महिने उलटले तरी, अद्याप एकाही विक्रेत्याने मंडईत व्यवसायाला सुरुवात केलेली नाही. भाजीमंडई आजही भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनलेली असताना सदर मंडई सुरू व्हावी आणि पालिकेच्या खजिन्यात उत्पन्न जमा व्हावे, यासाठी महापालिकेचा मात्र आटापिटा सुरू असून, पालिकेने उर्वरित ३१६ ओट्यांसाठी ७ डिसेंबरला लिलावप्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. दरम्यान, किराणा व्यावसायिकांनी सदर जागेत व्यवसाय सुरू करण्यास संमती दर्शविल्याने पालिकेने त्यांना मांडणी उभारण्याकरिता खास भिंतीलगतची जागा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने गोदाघाटावरील भाजीबाजार हटविण्यासाठी व तेथील विक्रेत्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध व्हावी, याकरिता सुमारे ६ कोटी रुपये खर्चून गणेशवाडी येथे भाजीमार्केट उभारले होते. परंतु, गोदाघाटावरील विक्रेत्यांनी मार्केटमध्ये जाण्यास नकार दिल्याने मार्केट अनेक वर्षे धूळखात पडून होते. भाजीबाजार भरत नसल्याने या मार्केटचा ताबा नंतर भिकाऱ्यांनी घेतला. दरम्यान, न्यायालयाने गोदाघाटावरील भाजीमार्केट हटविण्याचे आदेश जून महिन्यात दिल्यानंतर महापालिकेने गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी दि. १० जून २०१५ रोजी लिलावप्रक्रिया राबविली होती. या लिलावात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांकडून महापालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये अनामत रक्कम घेतली. त्यानुसार लिलावात १५२ ओट्यांना बोली बोलली जाऊन महापालिकेला महिनाभराचे भाडे २ लाख ४३० रुपये प्राप्त झाले होते, तर अनामत रकमेच्या माध्यमातून ७ लाख ६० हजारांचा महसूल खजिन्यात जमा झाला होता. उर्वरित ३१६ ओट्यांना मागणीच न आल्याने त्यांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला होता. लिलावप्रक्रियेत सर्वाधिक बोली मासिक २ हजार रुपये भाड्यासाठी बोलली गेली होती, तर महापालिकेने १३५० रुपयांपासून सुरुवात केली होती. लिलावप्रक्रिया राबविल्यानंतर महापालिकेने सदर मार्केटची दुरुस्ती व साफसफाई करून सुविधाही उपलब्ध करून दिल्या. परंतु, १५२ लिलावधारक विक्रेत्यांनी अद्याप आपल्या व्यवसायाचे बस्तान मार्केटमध्ये बसविलेले नाही. सिंहस्थ कुंभपर्वणी काळानंतर विक्रेत्यांकडून मार्केटचा ताबा घेतला जाईल, अशी अटकळ बांधली गेली; परंतु आता पर्वणी संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी विक्रेत्यांकडून कसलीही हालचाल दिसून येत नाही. महापालिकेमार्फत संबंधित विक्रेत्यांना मात्र कब्जा पावती केल्यानंतर मासिक भाडे आकारणी सुरू झाली आहे. विक्रेत्यांनी मार्केटकडे पाठ फिरविल्याने पुन्हा एकदा मार्केटचा ताबा भिकाऱ्यांनी घेतला आहे. भाजीमंडईकडे याअगोदरच्या विक्रेत्यांनी पाठ फिरविली असतानाच महापालिकेने उर्वरित ३१६ ओट्यांसाठी पुन्हा एकदा लिलावप्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये किराणा व्यावसायिकांनी स्वत:हून मंडईत व्यवसायासाठी परवानगी मागितल्याने पालिकेने मार्केटच्या उत्तरेकडील भिंतीलगतची खुली जागा त्यांना उपलब्ध करून दिली आहे. सुमारे १२ व्यावसायिकांना मांडणी ठेवून व्यवसाय करता येणार आहे. किराणा व्यावसायिकांच्या संमतीमुळे मंडई सुरू होण्याची आशा पालिकेला निर्माण झाल्यानेच उर्वरित ३१६ ओट्यांचा लिलाव काढण्यात आल्याचे समजते.
गणेशवाडी भाजीमंडईसाठी पालिकेचा आटापिटा
By admin | Published: November 30, 2015 10:47 PM