नाशिक - महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोध मोहीम सुरू केली असून त्यात पाणीचोरी करणा-या ३५ अनधिकृत नळजोडणी धारकांविरूद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तिव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.शहरातील अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करुन घेण्यासाठी महापालिकेने ४५ दिवसांची अभय योजना राबविली होती. परंतु, या योजनेला सुमारे २५०० नळजोडणीधारकांनीच प्रतिसाद दिला. त्यामुळे महापालिकेने सहाही विभागामध्ये अनधिकृत नळकनेक्शन शोध मोहीम बुधवार (दि.२१) पासून हाती घेतली. त्यानुसार, गुरुवारी (दि.२२) राबविलेल्या मोहिमेत पाणीचोरी करणारे तब्बल ३५ नळजोडणीधारक आढळून आले. महापालिकेने या पाणीचोरांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करत दणका दिला आहे. सदर मोहीमेअंतर्गत नाशिक पश्चिम विभागात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये उपअभियंत्यांनी तक्रार दाखल केल्याने चंद्रकांत जगन्नाथ आगले , संतोष रविंद्र चांदवडकर, चंद्रभागा नारायण कस्तुरे, विशाल देवराम चांदवडकर, मनोज लक्ष्मण काकडे, संजय मोरे, भगवान गांगुर्डे, गणेश राजाराम मुर्तडक, लालाशेट निमाणी, सुधाकर रामभाऊ वाघमारे, सतीश पाटील, मदन गांगुर्डे, मनोज चांदगुडे, गणेश मुतर्डक, प्रकाश दाधिच, कैलास गंगाधार वाघमारे, कुलकर्णी, प्रकाश चोकसी, सुधीर शिंपी, मोफतलाल मेहता या अनिधकृत नळजोडणी धारकांवर गुन्हा दाखल केलेला आहे . तसेच पंचवटी विभागात निलेश तुपे, मुरलीधर मंडलीक, रोकडे, योगिता साडी सेंटरचे मालक तर सिडको विभागात इंदिरा नगर पोलिस स्टेशनमध्ये माऊली प्राईड अपार्टमेंटचे चेअरमन, तसेच संजीव सुखदेव रोकडे, मदन ढेमसे, सातपुर विभागात प्लंबर गौतम श्रीरंग गांगुर्डे, काळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविली आहे. नाशिकरोड विभागातही ८ नळजोडणीधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये पाणीचोरांना महापालिकेने दिला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 8:29 PM
३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल : अनधिकृत नळजोडणी खंडित
ठळक मुद्देअनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करुन घेण्यासाठी महापालिकेने ४५ दिवसांची अभय योजना राबविली होतीमहापालिकेने सहाही विभागामध्ये अनधिकृत नळकनेक्शन शोध मोहीम बुधवार (दि.२१) पासून हाती घेतली