नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता अंशत: शिथिल झाल्यानंतर अखेर पालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांंना ते मिळू लागले आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना, केवळ कायम कर्मचारीच नव्हे, तर विविध विभागांतील अस्थायी कर्मचाऱ्यांनादेखील सानुग्रह अनुदान देण्यात आल्याने पालिकेला तब्बल ११ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा १३ हजार १११ रुपयांचे सानुग्रह घोषित करण्यात आले असून, निवडणूक आचारसंहितेमुळे ते प्रलंबित होते. म्युनिसिपल कर्मचारी सेनेने आंदोलनाचा पवित्रा घेताच जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन महापालिकेने गुरुवारीच कर्मचाऱ्यांच्या बॅँक खात्यात धनादेश टाकले होते, ते आजपासून वटण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या वतीने केवल स्थायी कर्मचारीच नाही, तर अस्थायी कर्मचारी म्हणजेच हंगामी, रोजंदारी, मानधनावरील कर्मचारी, सुवर्ण जयंती रोजगार योजना तसेच शिक्षण मंडळाचे शिक्षक, कर्मचारी, इतकेच नव्हे तर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मानद सेवा देणारे डॉक्टर या सर्वांना १३ हजार १११ रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे पालिकेवर ११ कोटी रुपयांचा बोजा पडला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना मिळाले सानुग्रह अनुदान
By admin | Published: October 18, 2014 12:34 AM