नाशिक : कुंभमेळा अवघ्या पाच महिन्यांवर आला असताना गोदावरीचे प्रदूषण थांबलेले, तर नाहीच उलट पाणवेलीमुळे नदीपात्र हिरवेगार दिसत आहेत. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता स्पष्ट झाली आहे. प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने केला आहे. न्यायालयाचाच एक प्रकारे अवमान करण्यात आला असून, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.गोदावरी नदीत होणारे प्रदूषण हे पालिकेच्या चुकीमुळे होत असल्याने यासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले. त्यावेळी गोदावरी प्रदूषण थांबवू, असे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाने प्रदूषण थांबविण्यासाठी निरी या संस्थेला समन्वयक म्हणून नियुक्त केले. या संस्थेने प्रदूषण थांबविण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु ती केली जात नाही त्यामुळे गोदावरी नदीत अद्यापही सांडपाणी मिसळत असून, त्याचा दुष्परिणाम म्हणूनच पाणवेली झाल्याचे दिसत आहे, असे मंचचे निशिकांत पगारे यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या संस्थेच्या सूचनांचे पालनही महापालिका करीत नसेल तर ही बाब गंभीर आहे. आंदोलन तीव्र केले जाईलच शिवाय न्यायालयाच्याही हे निदर्शनास आणून दिले जाईल, असे मंचने स्पष्ट केले आहे.
प्रदूषण थांबविण्यासाठी निरीने दिलेल्या सूचनांना महापालिकेने धाब्यावर बसविल्या
By admin | Published: February 04, 2015 1:47 AM