नाशिक : अतिवृष्टी आणि महापुरानंतर शहरात ठिकठिकाणी साचलेला गाळ व कचरा काढण्याचे काम सुरूच असून, सोमवारी दिवसभरात १८७ घंटागाड्यांमार्फत ४४७ टन कचरा उचलण्यात आला, तर ८३ ठिकाणी गाळ व माती काढण्याचे काम करण्यात आल्याची माहिती मनपामार्फत देण्यात आली.शहरात अजूनही ठिकठिकाणी पाणी, गाळ व कचरा साचलेला आहे. सोमवारी सहाही विभागांत १८७ घंटागाड्यांमार्फत ४४७ टन कचरा उचलण्यात आला. नाशिक पूर्व विभागातून ८५ टन, पश्चिममध्ये ७१ टन, नाशिकरोडमध्ये ८३ टन, पंचवटीत ७४ टन, सिडकोत ८० टन, तर सातपूरमधून ५२ टन कचरा उचलण्यात आला. तसेच महापालिकेने राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत सहाही विभागांतून १६ घंटागाड्यांच्या माध्यमातून ३२ टन कचरा उचलण्यात आला. याशिवाय, शहरात ८३ ठिकाणी साचलेला गाळ १५ जेसीबी व २८ ट्रॅक्टरच्या मदतीने साफ करण्यात आला, तर २४० ठिकाणी खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती मनपाच्या बांधकाम विभागामार्फत देण्यात आली. शहरात दिवसभरात तीन ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. मनपाच्या अग्निशमन विभागामार्फत पाच जणांची सुटका करत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. (प्रतिनिधी)
पालिकेने उचलला ४४७ टन कचरा
By admin | Published: August 08, 2016 11:32 PM