नाशिक : जिल्ह्यातील शेतकरी पेठरोड व दिंडोरीनाक्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीस आणतात. परंतु, कोरोनामुळे सुरक्षित अंतर रहावे म्हणून बाजार समिती सर्व शेतमाल आवारात विक्रीस परवानगी देत नसल्याने अनेक शेतकरी रस्त्यावर वाहने उभी करून येणाऱ्या ग्राहकांना थेट शेतमालाची विक्री करतात. मात्र शहर पोलीस व महापालिका कर्मचारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलत शेतमाल विक्रीत मज्जाव करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, अशाप्रकारे बाजार समिती, मनपा व पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पंचवटी परिसरात शेतमाल विक्रीस पोलीस व नाशिक महापालिका मनाई करतानाच मारहाण व अर्वाच्य भाषेत बोलत वाहनांच्या काचेवर काठ्या मारण्यापर्यंत अरेरावीची भूमिका घेतात. तसेच शेतमाल व शेतकऱ्यांच्या जाळ्याही जप्त करतात. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना आत प्रवेश देत नाही व पोलीस आणि नाशिक महापालिका रस्त्यावर शेतमाल विक्री करू देत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. प्रत्यक्षात सरकारने देशातील शेतकरी आपला शेतमाल कुठेही, कोणत्याही शहरात व बाजारपेठेत विक्री करू शकतो यासाठी अध्यादेश काढला आहे. असे असताना नाशिक शहरात मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक महापालिका व पोलीस वाहन दिसले की शेतकऱ्यांना अक्षरश: आपली वाहने घेऊन पळत सुटावे लागते. एखाद्या अट्टल गुन्हेगारापेक्षाही शेतकऱ्यांना वाईट वागणूक दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, अशाप्रकारे अन्यायकारक कारवाया थांबविल्या नाहीत जिल्हाभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतमाल विक्रीत मनपा, पोलिसांचा अडसर ; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:19 PM
कोरोनामुळे सुरक्षित अंतर रहावे म्हणून बाजार समिती सर्व शेतमाल आवारात विक्रीस परवानगी देत नसल्याने अनेक शेतकरी रस्त्यावर वाहने उभी करून येणाऱ्या ग्राहकांना थेट शेतमालाची विक्री करतात. मात्र शहर पोलीस व महापालिका कर्मचारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलत शेतमाल विक्रीत मज्जाव करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, अशाप्रकारे बाजार समिती, मनपा व पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
ठळक मुद्देपंचवटी परिसरात शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांना अडचणपोलीस, मनपा कर्मचाऱ्यांकडून विक्री करण्यास मज्जावशेतकऱ्यांचा जिल्हाभरात रास्तारोको करण्याचा इशारा