नाशिक : नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि.२१) करण्याचे नियोजित केले होते. परंतु, ऐनवेळी त्यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने मुंढे यांनी अशा परिस्थितीतही उपक्रमस्थळी हजेरी लावत उपस्थित नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त केली आणि उपक्रम पुढच्याशनिवारपर्यंत रहित केला. दरम्यान, या उपक्रमांतर्गत ६९ तक्रारी व सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित खातेप्रमुखांना दिले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय कामकाजात शिस्त लावतानाच काही धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. याशिवाय, नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी ‘एनएमसी ई-कनेक्ट’ नावाचे मोबाइल अॅपही उपलब्ध करून दिलेले आहे. सदर अॅपवर येणाऱ्या तक्रारींच्या निराकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच मुंढे यांनी नवी मुंबई येथे त्यांच्या कारकिर्दीत राबविलेली ‘वॉक विथ कमिशनर’ ही संकल्पना नाशिक येथेही राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शनिवारी (दि.२१) सकाळी ६.३० वाजता गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले होते. मैदानावरील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर एक छोटेखानी व्यासपीठ उभारण्यात आले होते.याशिवाय, समोर नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी टोकन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी पाच ते सहा टेबल मांडण्यात आले होते. टोकन घेतलेल्या नागरिकाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर करायचे आणि आयुक्तांनी तक्रारीचे स्वरूप पाहून संबंधित खातेप्रमुखाला आदेशित करायचे, असा हा उपक्रम होता. सकाळी ६ वाजेपासून टोकन देण्यास सुरुवात झाली. उपस्थित नागरिकांकडून आयुक्तांची प्रतीक्षा केली जात असतानाच ६.४५ वाजेच्या सुमारास आयुक्त तुकाराम मुंढे हे घाईघाईने उपक्रमस्थळी आले आणि त्यांनी ध्वनिक्षेपक हाती घेत आपल्या मातोश्रीची प्रकृती अचानक बिघडल्याने सदरचा कार्यक्रम पुढच्या शनिवारी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. नागरिकांच्या तक्रारी संकलित करून त्यांचे निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही शांतता ठेवली. तत्पूर्वी, पहाटे ५ वाजेपासूनच दोन्ही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांसह सर्व खात्यांचे अधिकारी झाडून मैदानावर उपस्थित होते.जॉगिंग ट्रॅकवर स्वच्छताआयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम कान्हेरे मैदानावर होणार असल्याने जॉगिंग ट्रॅकवर स्वच्छता दिसून आली. अशीच स्वच्छता कायमस्वरूपी राहावी, अशी भावना यावेळी जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली. याशिवाय, एका नागरिकाने जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारण्यासंबंधीची सूचना थेट आयुक्तांकडे केली असता, त्यांनी सकाळ-संध्याकाळ त्याबाबतचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.अतिक्रमण, पाणीपुरवठाविषयक तक्रारी‘वॉक विथ कमिशनर’ या पहिल्याच उपक्रमात ६९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात प्रामुख्याने, अतिक्रमण आणि पाणीपुरवठाविषयक तक्रारी अधिक होत्या. याशिवाय, गाळेधारक संघटनांकडूनही गाळेभाडे कमी करण्याविषयीचे निवेदन होते तर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून आडगाव येथील ट्रक टर्मिनस येथे सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आलेली होती. जॉगर्स क्लबच्या वतीने गोल्फ क्लबवरील जॉगिंग ट्रॅकच्या बाबत सुविधांची मागणी होती. एका इसमाने प्रभाग समित्यांवर सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना सदस्यत्व मिळावे, अशी सूचना केलेली होती. मोकळ्या भूखंडावरील वहिवाट, अस्वच्छतेचाही विषय होता. शासनाचे अनधिकृत बांधकामविषयक धोरण प्रभावीपणे राबविण्याची सूचना होती. काही भागात रस्ता डांबरीकरणाची मागणी होती.
पालिकेकडे ६९ तक्रारी, सूचना प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:34 AM