नाशिक - महापालिकेच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत १० कोटी रूपये जमा झाले आहेत. या योजनेमुळेच महापालिकेने कधी नव्हे १२० कोटी रूपयांच्या पल्ल्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
शहरातील अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रूपयांची घरपट्टी थकली असून ती वसुल करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. काही मिळकतींचे लिलाव देखील करण्यात येत आहेत. मात्र गेल्यावर्षी प्रथमच थकीत रकमेवरील शास्तीत (दंडात) सवलत देण्याची अभय योजना राबविण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात १६ कोटी रूपये महापालिकेला मिळाले होते. तर आता दुसºया टप्प्यात डिसेंबर पासून १४ जानेवारी पर्यंत १० कोटी रूपयांची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत १६ कोटी रूपये वसुल झाले होते. त्यानंतर यंदा आत्तापर्यंत दहा कोटी असे एकुण २६ कोटी रूपये अभय योजनेमुळे वसुल झाले आहेत.
महापालिकेची गेल्या वर्षी ९४ कोटी १० लाख रूपयांची घरपट्टी वसुल झाली होती. यंदा ११६ कोटी ५५ लाख म्हणजेच २२ कोटी ४४ लाख रूपयांनी अधिक वसुली झाली आहे.