नाशिक शहरात झपाट्याने बांधकामे होत असताना नाले, तलाव आणि विहिरी बुजविण्याचे कामदेखील वेगाने सुरू आहे. नाशिक महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून नाले बुजवून त्यावर बांधकामे झाल्याचा विषय गाजत आहे. मात्र, ठोस निर्णयापर्यंत हा विषय गेलेला नाही. नदी, नाले मोकळे करणे, विहिरी टिकवून ठेवणे हे नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त आहेच, परंतु त्याचबरोबर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनदेखील महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या २०१७ मध्ये केलेल्या आराखड्यात केवळ ६३ नाले आढळले असून, त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत अनेक नाले तर गायब झाले असून, प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.
इन्फो..
हे घ्या पुरावे!
१ महापालिकेचे राजीव गांधी भवन हे चक्क नाल्यावरच बांधण्यात आले आहे. त्यामुळे अन्य नाले बुजवून बांधकामे करणाऱ्यांना काय बोलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा नाला बंदिस्त असल्याने दर पावसाळ्यात महापालिकेच्या मुख्यालयासमोरच तळे साचते.
२ महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेला पोलीस अकादमीजवळून निघणारा नाला पुढे विसे मळ्यातून गंगापूर रोडकडे जात असे. आता या नाल्याचादेखील शोध घेण्याची वेळ आली आहे.
३ नाशिक शहरातील चोपडा नाल्यापासून सरस्वती नाला इतकेच नव्हेतर, वाघाडी नाला असे अनेक नाले बुजलेले आहेत. तसेच सिडकोतीलदेखील अनेक नाले गायब झाले आहेत.
इन्फो...
नाल्याचा प्रवाह थांबवला, उभ्या राहिल्या इमारती
नाशिक शहरात पूर्वी कितीही पाऊस झाला तरी पाणी साचून शहराच्या विविध भागांतील संपर्क खंडित होत नव्हता. मात्र २००८ मध्ये आलेल्या पुरानंतर हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
नाशिक शहरातील अनेक भागांत नैसर्गिक नाले बंद करण्यात आले असून, त्या जागेवर इमारती उभारण्यात आल्या आहेत. अर्थात हे सर्वच बेकायदेशीररीत्या नाही, तर अनेक ठिकाणी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या परवानगीने हा प्रकार घडला आहे.
कोट...
शहरात ६३ नाले असल्याचे विकास आराखडा तयार करताना नोंदवले गेले आहे. आता या नाल्यांची स्थिती काय आहे, हे सर्वच प्रत्यक्ष सर्वेक्षणातून तपासले जात आहे. आत्तापर्यंत २२ नाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वच नाले तपासायचे असतील तर गाव नकाशे तपासावे लागतील.
- संजय अग्रवाल, उपअभियंता, नगररचना
कोट...
नाशिक महापालिकेकडून चांगले पाऊल उचलले जात आहे. नाले बुजविल्याने किंवा बंदिस्त झाल्याने थोड्याच पावसात पूर परिस्थिती निर्माण होते. ती टाळण्यासाठी नाल्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. नाल्याकाठी सुशोभीकरण किंवा अन्य पर्यायांचा वापर करावा, मात्र नाले बुजवू नयेत.
- राजेश पंडित, पर्यावरण अभ्यासक
कोट...
नाले आणि नदी प्रमाणेच नाले आणि भूगर्भाचा परस्पर संबंध असतो. कित्येकदा सखल भागातील पाणी नदीत आणताना जमिनीखालील पाणीही त्या माध्यमातून आणले जाते. नाले असणे हे पर्यावरणीयदृष्टीने आवश्यक आहे. मध्यंतरी पुण्याला आलेल्या पुराचा संदर्भ लक्षात घेतला तर नाले संवर्धन किती आवश्यक आहे, ते लक्षात येते.
- प्राचार्य प्राजक्ता बस्ते, पर्यावरण तज्ज्ञ