नाशिक : महापालिकेने करदात्यांना एप्रिल ते जून महिन्यात वेळेत कर भरणाऱ्यांना दिलेली सवलत रद्द तर केली आहेच; शिवाय आता शास्तीची मुदतही अलीकडे केली आहे. पूर्वी आॅक्टोबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यातील घरपट्टी न भरणाºयांना दोन टक्के शास्ती (दंड) केली जात असे; परंतु आता जुलैपर्यंत कर न भरल्यास हा दंड आकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने मिळकत करात अठरा टक्के करवाढ करण्यात आल्याने नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात कर भरल्यास पाच टक्के, त्यानंतर मे महिन्यात तीन टक्के, तर जून महिन्यात कर भरल्यास दोन टक्के सवलत दिली जात असे. याशिवाय सोलर पॅनलने पाणी तापवण्याची व्यवस्था असल्यास पाच टक्के सूट दिली जाते. तसेच आॅनलाइन घरपट्टी भरल्यास आणखी एक टक्का सूट देण्याची तरतूद आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात घरपट्टी भरल्यास व सोलर पॅनल असल्यास थेट अकरा टक्के सूट मिळत असे. त्यामुळे एप्रिल महिन्यात महापालिकेला मोठ्या प्रमाणात मिळकत कर मिळत होता. परंतु आता महापालिकेने पाच, तीन व दोन टक्के कर भरण्याची सवलत रद्द केली आहे; शिवाय आॅक्टोबर महिन्यापर्यंत घरपट्टी भरल्यास दोन टक्के शास्ती भरावी लागत होती. तिचा कालावधी घटवून आता जुलैपर्यंत करण्यात आला आहे. म्हणजेच जुलैनंतर घरपट्टी भरणाºयांना दोन टक्के शास्ती ही चक्रवाढ पद्धतीने असून, त्यामुळे वर्षभर घरपट्टी न भरल्यास चोवीस टक्केप्रमाणे दंड भरावा लागणार आहे. आधीच घरपट्टीत १८ टक्के वाढ, त्यात सवलत बंद आणि आता शास्ती (दंड) तीन महिने आधीच करण्यात आल्याने नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महापालिकेच्या करदात्यांना आता जुलैपासूनच शास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:19 AM