नाशिक : महापालिका हद्दीतील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी अर्थात ड्रेनेजची व्यवस्था महापालिकेने करावी, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग मित्र समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा आपला आग्रह कायम ठेवला. परंतु, महापालिकेने सदर विषय धोरणात्मक निर्णयाचा भाग असल्याने असमर्थता दर्शविली. त्यामुळे मुंबईत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात येऊन महापालिकेने ड्रेनेजचा चेंडू महामंडळाकडे टोलविला. दरम्यान, बैठकीत औद्योगिक वसाहतीतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. उद्योग मित्र समितीची बैठक महापालिकेत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने ड्रेनेजचा विषय पुन्हा उपस्थित झाला असता स्वतंत्र पाइपलाइन, पाणीपुरवठा आदि सुविधा महामंडळ देत असताना महापालिकेने ड्रेनेजची व्यवस्था कशासाठी करावी, असा प्रश्न केला गेला. अखेर मुंबईतच संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. बैठकीत अंबड वसाहतीत अग्निशमन केंद्र सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. अंबड येथे महामंडळामार्फत अग्निशमन केंद्रासाठी इमारत उभी करून दिली जाईल; परंतु त्याची देखभाल व अन्य जबाबदारी महापालिकेने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु सदर विषय धोरणात्मक असल्याने महामंडळाने संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांना झेब्रा पट्टे मारणे, रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण तसेच अस्तरीकरण यावरही चर्चा झाली. परंतु महापालिकेच्या अंदाजपत्रकातील आर्थिक तरतुदीनुसार कामे हाती घेतली जातील, असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले. खड्डे भरणे, पथदीप दुरुस्ती, घंटागाड्या नियमित चालविणे, नवीन विकास आराखड्यात ट्रक टर्मिनससाठी जागा आरक्षित करणे, औद्योगिक परिसरात रिक्षा व टेम्पो यांच्या थांब्यांचे नियोजन करणे, महत्त्वाच्या चौकांचे रुंदीकरण व सुशोभिकरण, त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक आदि मुद्द्यांवर चर्चा करण्यात येऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वसाहतीत पिकअप शेड उभारणे, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण, वृक्षारोपण आदि उपक्रम कंपनीच्या सीएसआर प्रकल्पांतून राबविण्याची सूचना महापालिकेने केली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जोशी, कार्यकारी अभियंता बंडोपाध्याय, उद्योजक संघटनांचे पदाधिकारी संजीव नारंग, ज्ञानेश्वर गोपाळे, पाटणकर, रमेश पवार, व्हिनस वाणी, विवेक पाटील, मनपाचे शहर अभियंता सुनील खुने, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार व आर. के. पवार, अग्निशमन प्रमुख अनिल महाजन उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ड्रेनेजचा चेंडू महापालिकेने टोल
By admin | Published: December 29, 2015 12:17 AM