नाशिक : हवामान शास्त्रज्ञांनी आगामी काळात ‘अल निनो’ या वादळामुळे कडक उष्णता व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केल्याने नाशिक महपालिकेने त्याची धास्ती घेतली असून, धरणांच्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याच्या भीतीमुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल, त्यासाठी अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी २००९, २०१४, २०१५ व २०१८ मध्ये आलेल्या ‘अल निनो’मुळे देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर परिणाम झाल्याने पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे यंदाही ‘अल निनो’चा धोका कायम राहिल्यास पावसाचे प्रमाण घटून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, शिवाय उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडून उष्णता निर्माण होईल व त्यातून धरण, तलाव, कालवे, विहिरी, नद्यांच्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात ‘अल निनो’चा धोका अधिक असून त्याचा परिणामी खरीप हंगामावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस व थंडीचे प्रमाण सोडता नजीकच्या काळात उष्णता वाढण्याची त्याच बरोबर गंगापूर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यत आहे. तसे झाल्यास नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊन पाणी कपात किंवा पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही