नाशिक : खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे उत्पन्नाचे नवे नवे स्त्रोत शोधणाऱ्या महापालिकेला ‘हॉकर्स झोन’च्या माध्यमातून वसूल होणाऱ्या भाडेपट्टीतून मासिक सुमारे एक ते दीड कोटी रुपयांची कमाई अपेक्षित असून, सध्या विस्कळीत स्वरूपात असलेल्या बाजार फी वसुलीतही सुसूत्रता येणार आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील १९० ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित करत तसा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. पोलीस आयुक्तालयाने केलेल्या सूचनांचा अंतर्भात करत सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महिनाभरात महासभेवर ठेवला जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार नाशिक महापालिकेने शहर फेरीवाला समितीची स्थापना करत त्या माध्यमातून १९० मुक्त फेरीवाला, ८९ ना फेरीवाला आणि ७० प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित केली आहेत. सध्या शहरात ठिकठिकाणी विशेषत: वर्दळीच्या भागात मोक्याच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी रस्त्यांवर ठाण मांडत व्यवसाय थाटलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. महापालिका या फेरीवाल्यांकडून दैनंदिन बाजार फी वसुली करत असते; परंतु जो रस्त्यावर दिसेल त्याच्याकडून ही वसुली केली जात असल्याने त्याचे कोठेही ठरावीक रेकॉर्ड उपलब्ध नाही, शिवाय वसुलीतही सुसूत्रता नाही. महापालिकेला सध्या या बाजार फी वसुलीतून सुमारे ७० ते ७५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न प्राप्त होत असते. आता महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोनच निश्चित केल्याने आणि जागांच्या वर्गीकरणानुसार नोंदणीकृत फेरीवाल्यांकडून त्याची दैनंदिन भाडे आकारणी होणार असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधीने वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या महापालिकेकडे ९५०४ हॉकर्सची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी झालेली आहे. महापालिका व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या जागांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करत त्यानुसार जागा भाडे दर निश्चित करणार आहे. प्रति फेरीवाला किमान ५० रुपये दैनंदिन भाडे वसुली झाली तरी दिवसाला साडेचार लाख रुपये वसुली होऊ शकते. त्यानुसार महापालिकेला दरमहा एक-दीड कोटी, तर वार्षिक सुमारे १५ ते १६ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होऊ शकते. मध्यवर्ती व वर्दळीच्या भागातून महापालिकेच्या उत्पन्नात यापेक्षाही अधिक भर पडू शकते. येत्या दोन महिन्यांत सदर फेरीवाला क्षेत्राची अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात त्यासंबंधी अपेक्षित उत्पन्न धरले जाणार आहे. महापालिकेने १९० हॉकर्स झोन निश्चित केल्यानंतर सदरचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सूचनांसाठी पाठविला असून, त्यानंतर तो महिनाभरात महासभेवर ठेवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
महापालिकेला ‘हॉकर्स झोन’च्या माध्यमातून दीड कोटी रुपयांची कमाई अपेक्षित
By admin | Published: February 04, 2015 1:43 AM