नाशिक : शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन पाचशेपर्यंत पोहोचली आहे. ही संख्या अधिक वाढणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. महापालिकेने चार खासगी रुग्णालयांच्या पलीकडे अन्य अनेक रुग्णालयांचा शोध सुरू केला आहे.शहरातील बाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. दाट वस्ती भागात रुग्णांची संख्या भयावह पद्धतीने वाढत असून, एकास संसर्ग झाला की लगेचच त्याच भागात आठ ते दहा रुग्ण सहज वाढत आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने आता अन्य तयारीदेखील सुरू केली आहे. सध्या कोरोनावरील उपचारासाठी महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय आहेच. परंतु शहरातील अशोका, वोक्हार्ट, सह्याद्री आणि अपोलो या मोठ्या रुग्णालयांचा महापालिकेला मोठा आधार लाभला आहे. तर विलगीकरणासाठी तपोवन, नाशिकरोड येथील फायर स्टेशन क्वॉर्टर, खत प्रकल्पाजवळील प्रशिक्षण केंद्र आणि गंगापूर येथील रुग्णालय, याशिवाय समाज कल्याण विभागाचे वसतिगृहदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने अनेक रुग्णालयांशी चर्चा सुरू करून त्यांच्याकडील वीस टक्के बेड तरी मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महात्मानगर परिसरातील एक रुग्णालय तर केवळ महिला रुग्णांसाठीच आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय लहान मुलांसाठीदेखील अशाच प्रकारे स्वतंत्र रुग्णालय मिळू शकेल काय, याबाबत चाचपणी सुरू आहे.कोट...महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांतील काही बेड मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात फार गंभीर नसलेले रुग्णदेखील आहेत. त्यामुळे नागरिकांनी अकारण बेड अडविण्यापेक्षा गरजेच्या कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावे.- डॉ. आवेश पलोड, प्रमुख, कोरोना सेल
महापालिकेला हवी आहेत खासगी रुग्णालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 4:39 PM
शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन पाचशेपर्यंत पोहोचली आहे. ही संख्या अधिक वाढणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. महापालिकेने चार खासगी रुग्णालयांच्या पलीकडे अन्य अनेक रुग्णालयांचा शोध सुरू केला आहे.
ठळक मुद्दे रुग्णांची वाढती संख्या: वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहनसमाज कल्याण विभागाचे वसतिगृहदेखील ताब्यात