नाशिक- कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात विविध भागात जंतु नाशकांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र, असे करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या औषधांचा आणि साधनांचा वापर करून काही नगरसेवक आणि राजकिय नेतेच फवारणी करीत आहे. महापालिकेच्या कामावर अंकुश ठेवण्याऐवजी ही चमकोगिरी सुरू झाल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्याला अटकाव केला असून यापुढे खासगी संस्था किंवा व्यक्ती यांच्याकडून निर्जंतुकीकरण फवारणी करू नये अशी तंबीच खाते प्रमुखाना दिली आहे.
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून विविध कामांसाठी ३१ पथके कार्यान्वीत करण्यात आली आहेत. त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीचा आढावा गुरूवारी (दि.२) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला.
कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्याबाबत केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.सदर निर्जंतुकीकरण फवारणी ही महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत करण्यात यावी तसेच अन्य खाजगी संस्था व व्यक्ती यांच्याकडून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येऊ नये अश्या शासनाच्या सूचना असून त्याचे काटेकोर पालन करण्यात यावे.शहरातील ठिकठिकाणी करणेत येणारी औषध फवारणी शासन निर्णयाप्रमाणे मनपाची साधन सामुग्रीचा वापर करून मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून मनपाच्या स्तरावर होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे महापालिकेने फवारणी सुरू केल्यानंतर घरातील आणि परीचीतांचे ट्रॅक्टर आणून फवारणी करणाºया आणि त्याचेही श्रेय लाटणा-या नगरसेवकांना तसेच अन्य राजकिय नेत्यांना चाप बसणार आहे.