नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वाेपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. संशयित रुग्णांचे अहवाल तत्काळ मिळावे यासाठी आता महापालिकेच्या वतीनेच थेट पुण्याला घसास्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने आता जिल्हा शासकीय रुग्णालयावर विसंबून राहणे थांबले आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाच्या अंदाजानुसार नाशिक शहरात हजारेक रुग्ण होतील, या शक्यतेने रुग्णालयांबरोबरच अनेक वसतिगृहे अधिग्रहीत करण्याचा प्रस्ताव कायम असला तरी त्याची गरज पडण्याची शक्यता नाही. तथापि, महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची प्राथमिक आणि गंभीर लक्षणे लक्षात घेऊन त्यादृष्टीने महापालिका आणि खासगी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.नाशिक शहरात सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित आहे. मुंबई, पुणे आणि मालेगाव यांसह अन्य भागातून नाशिकमध्ये येणाऱ्यांचे मार्ग बंद झाले असते तर सध्या असलेली संख्यादेखील झाली नसती. तथापि, आतापर्यंत शहरात ४९ बाधित रुग्ण आढळले असून, त्यात ३७ बाधित बरे झाले असल्याने सध्या १२ बाधित उपचार घेत आहेत. केंद्र शासनाने मे १५ पर्यंत नाशिक शहरात अंदाजे वाढणारी संख्या ५६३ दर्शविली होती. परंतु नाशिक शहर आत्ताशी पन्नासपर्यंत संख्या आली असून, रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाशिक शहरात कोरोनाच्या प्राथमिक आणि त्यापेक्षा अधिक त्रास होणाºया रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये तयार ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार तपोवन, नाशिकरोड फायर क्वार्टर, विल्होळी प्रशिक्षण केंद्र आणि गंगापूर येथील रुग्णालयात अलगीकरण आणि प्राथमिक लक्षणे किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसलेल्यांसाठी अलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. तर केवळ डेडीकेटेड कोविड केअर म्हणजेच श्वसनाचे आणि अन्य अधिक त्रास होणाऱ्यांसाठी मात्र, महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय याबरोबरच तीन खासगी रुग्णालयांतदेखील उपचार करण्यात येत आहेत. त्यात अपोलो, सह्याद्री आणि वोक्हार्ट रुग्णालयाचा समावेश आहे.-----------------------एका दिवसात अहवाल मिळणारशहरात डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल तपासण्याची सोय असली तरी मालेगाव आणि जिल्ह्यातील अन्य भागातील नमुने तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने नाशिक शहरातील संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी विलंब होतो. मध्यंतरी आरोग्य संचालकांशी चर्चा करून पुण्यातील प्रयोगशाळेत नाशिक शहरातील प्रलंबित तीनशे नमुने तपासण्याचे ठरविले होते. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोडल अधिकारी म्हणून वेळेत नमुने पाठविले नव्हते. त्यामुळे आयुक्त गमे यांनी शल्य चिकित्सकांना नोटीस बजावली होती. आता मात्र, महापालिकेच्या वतीने स्वत:च्या खास वाहनाने दररोज पहाटे घसास्त्राव नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात आणि रात्री तेथून अहवाल मिळण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे शहरातील संशयितांचे रुग्ण नमुने वेगाने मिळण्यास प्रारंभ झाला आहे.
महापालिकाच थेट पाठविणार रुग्णांचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 9:23 PM