नाशिक : शहरात कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या तक्रारी असून, महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था वेगळी नाही. पुरेशा ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत नसल्याने महापालिकेने त्यावर पर्याय शोधला आहे. रुग्णांना हवेतील प्राणवायू देणारी १०० यंत्र म्हणजेच ‘ऑक्सिजन कॉन्सटेरटर’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेत. जिल्ह्यात सुमारे साडेतीन ते चार हजार रुग्ण सरासरी आढळत आहेत. त्यात सर्वाधिक तीन हजार रुग्ण तर नाशिक शहरातील आढळत आहेत. नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांबरोबरच धुळे, जळगाव, नंदुरबार या भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या रुग्णालये पूर्ण भरलेली असल्याचे सांगितले जात आहे. त्यातही ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याने तर रुग्णांचे अधिक हाल होत आहेत. नाशिक शहरात सध्या १८ ते २० हजारांच्या आसपास रुग्ण आहेत. मात्र ऑक्सिजन बेड्सची गरज भासली की ते मिळणे दुरापास्त झाले आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात एकूण ११९ रुग्णालयांतील ४ हजार ५६५ बेड्स कोरोना राखीव आहेत. त्यातील १ हजार ९९९ ऑक्सिजन बेड्स आहेत. प्रत्यक्षात मात्र अशाप्रकारे कोठेही नागरिकांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेने हवेतील प्राणवायू रुग्णास देणारी १०० यंत्र अर्थात ‘ऑक्सीजन कॉन्सटेरटर’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो...
ऑक्सिजन बेड्स तयार करणे हे अत्यंत खर्चीक काम असते. तसेच हे तत्काळ होणारे काम नाही. त्यामुळे हवेतील ऑक्सिजन देणारी शंभर ‘ऑक्सिजन कॉन्सटेरटर’खरेदी करण्यात येणार आहे. सर्वसाधारण बेडवर सुध्दा हे उपकरण बसवता येते. महापालिकेने यापूर्वीही १०० उपकरणे खरेदी केली होती. आत्ताही तातडीची गरज म्हणून ही उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.