सिडको : शहरासह सिडको व अंबड भागात कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी कुठल्या ठिकाणी बेड शिल्लक आहे याबाबतची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांना व्हावी यासाठी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वॉररूम ( हेल्पलाइन ) संपूर्णतः कोलमडलेली दिसून आली. त्यांच्याकडील संगणकीकृत माहिती अपडेट नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना केवळ हॉस्पिटलचा दूरध्वनी क्रमांक देण्यापलीकडे वॉररूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठलेच काम राहिले नाही.
सिडको व अंबड भागासह परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णांना बेडची व्यवस्था कुठे असेल, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे का याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्यावतीने कोविड वॉररूमची व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून हेल्पलाइनच्याद्वारे नागरिकांना कोरोनाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याने मनपाच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु शुक्रवारी याबाबत पाहणी केली असता, या वॉररूममध्ये दोनच कर्मचारी होते, त्यांना रुग्णांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे,याबाबतची माहिती विचारली असता, त्यांनी केवळ परिसरातील हॉस्पिटलची नावे सांगून त्या हॉस्पिटलचा मोबाइल क्रमांक दिला. संबंधित हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहे का हे विचारून घ्या असे सांगितले तसेच या पाहणीत कोरोना रुग्णांसाठी बेड कोणत्या हॉस्पिटलमध्ये शिल्लक आहे तसेच ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध आहे याबाबतचे सगळे अपडेट संगणकीकृत करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु या पाहणीत बंद पडलेले संगणक तसेच कुठल्याही प्रकारचे अपडेट या संगणकात नसल्याचे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे केवळ रुग्णांच्या नातेवाइकांना हॉस्पिटलचा मोबाइल क्रमांक देऊन त्यांनीच बेड उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत तसेच इतर काही माहिती लागल्यास मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात येत असल्याने महापालिकेने गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या वॉररूमचा कुठलाही फायदा रुग्णांच्या नातेवाइकांना होत नसल्याने वाॅररूम हे केवळ नावापुरतेच असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
चौकट ..
वॉररूमच्या माध्यमातून विभागातील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांचीही माहिती देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ही देखील माहिती वॉररूममध्ये उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
(फोटो २४ सिडको) -वॉररूममधील संगणक बंद अवस्थेत पडलेले आहेत.