सिडको : गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, सिडको व परिसरातील मनपाची उद्याने तसेच मोकळ्या मैदानात या टवाळखोरांनी आपला अड्डा बनविला असल्याने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना ही डोकेदुखी ठरत आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सिडको व अंबड परिसरात मनपाची शंभरहून अधिक उद्याने असून, यातील काही उद्यानांत लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी नसल्याने तसेच इतर कोणतीही सुविधा नसल्याने उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. याच उद्यानांचा ताबा आता स्वत:ला भाई समजणाºया गुंडांनी घेतला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. उद्यानात येणारे बहुतांशी टवाळखोर हे मद्य सेवन अथवा एखादी नशा केलेले असतात. तर काही याच ठिकाणी नशा करीत असल्याने त्यांना कोणी हटकले तर या टवाळखोरांकडून लगेचच दादागिरी केली जात असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले असून, याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हे टवाळखोर या भागात राहत नसतानाही परिसरातील एखाद्या मित्राबरोबर तेथे येतात व आपण येथील रहिवासी असल्याचे भासवतात. सिडको तसेच अंबड भागातील उद्याने हेच टवाळखोरांचे अड्डे बनले असल्याने या उद्यानांच्या परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानांमध्ये रात्री उशिरापर्यंत बसून धिंगाणा घालणे, रस्त्याने ये-जा करणाºया महिला अथवा मुलींची छेडछाड करणे, परिसरात दहशत पसरविणे असे प्रकार या गुंडांकडून केले जात असून, या टवाळखोर गुंडांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी सिडकोवासीयांनी केली आहे.हेल्मेट सक्तीच्या नावाखाली पोलिसांची दबंगगिरीएकीकडे सिडको भागातील गुन्हेगारांनी डोके वर काढलेले असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असताना अंबड पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून मुख्य चौक तसेच रस्त्यांवरून जाणाºया वाहनधारकांना हेल्मेट न घातल्याने अडवणूक करून त्यांच्याकडून आर्थिक तडजोड करण्याचे प्रकार केले जात आहे. विशेष म्हणजे पोलीस ज्या भागात हेल्मेट न घातलेल्यांवर कारवाई करीत आहे त्यामध्ये घराजवळ राहणाºया नागरिकांना तसेच महिलांनादेखील टार्गेट केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेची उद्याने बनली टवाळखोरांचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:35 AM