नाशिक : बेभरवशाचे गणले जाणारे महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार यंदाही प्रदान केले जाणार आहेत. मनपा शिक्षण विभागाने पुरस्कारप्राप्त १८ शिक्षकांची यादी तयार केली असून, येत्या सोमवारी (दि.४) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या मान्यतेनंतर त्याची अधिकृतपणे घोषणा होणार आहे.महापालिका शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना दरवर्षी मनपा शाळांतील उल्लेखनीय कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार दिले जात होते. परंतु, मागील पंचवार्षिक काळात तीन वर्षे पुरस्कार दिले गेले नाहीत. सन २०१५ मध्ये शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समितीची रचना करण्यात आली आणि समितीचा कारभार महापालिकेच्या अखत्यारित आला. समितीच्या सभापतिपदी अपक्ष संजय चव्हाण यांची नियुक्ती झाली. परंतु, त्यांना फारसे अधिकार नसल्याने सभापतिपद शोभेचे ठरले. मागील वर्षी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी शिक्षक पुरस्कारांची योजना पुन्हा सुरू केली. परंतु, शिक्षकदिनाचा मुहूर्त चुकला आणि नंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईने पुरस्कार वितरणाचे सोपस्कार पार पाडले गेले. आता महापालिका निवडणूक होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप सत्ताधारी भाजपाकडून शिक्षण समिती गठित होऊ शकली नाही. त्यामुळे समितीवर प्रशासकीय प्रमुख असलेले नितीन उपासनी यांनी शिक्षक पुरस्काराची योजना पुढे चालू ठेवत त्यादृष्टीने प्रस्ताव तयार केले आहेत. यंदा, मनपा शाळांबरोबरच खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार असून, त्यासाठी २० शिक्षकांची यादी तयार केली आहे. येत्या सोमवारी (दि.४) आयुक्तांच्या मान्यतेनंतर पुरस्कारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती नितीन उपासनी यांनी दिली.
यंदाही मिळणार महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 1:11 AM