नाशिक : अविश्वास ठरावामुळे दुखावलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची माफी मागण्यासाठी स्थायी समितीच्या काही सदस्यांनी केलेला प्रयत्न अखेर फसला. विरोधीपक्षातील सदस्यांनी विरोध केल्याने शनिवारी (दि.१५) काही सदस्यांनीच आयुक्तांची भेट घेतली. अर्थात, सभापती हिमगौरी आडके यांनी नगरसेवकांचा स्वेच्छाधिकार निधी वाढवून द्यावा यासाठी ही भेट असल्याचे सांगून माफीनाम्याचा इन्कार केला आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यासाठी स्थायी समितीच्या सदस्यांना विशेषाधिकार असल्याने तब्बल पंधरा सदस्यांच्या सह्या घेऊन महापौरांना निवेदन दिले होते. त्यानुसार १ सप्टेंबर रोजी विशेष महासभा बोलविण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप केल्याने हा अविश्वास ठराव बारगळला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे सदस्यांना माघार घेण्याची नामुष्की आली. या प्रकारानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांची माफी मागण्यासाठी भाजपाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. विशेषत: सभापती हिमगौरी आडके यांच्या वतीने पुढाकार घेऊन शनिवारी (दि.१५) सकाळी साडेअकरा वाजता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीची वेळ घेण्यात आली होती. त्यासंदर्भात सभापतींनी सदस्यांना मोबाइलवर मॅसेज करून आपले ठरल्याप्रमाणे आयुक्तांची वेळ घेतली आहे, असे कळविल्यानंतर विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला आणि कोणाचे कधी ठरले अशी विचारणा करतानाच आयुक्तांच्या माफीनाम्यास साफ विरोध केला आणि जाण्याचे टाळले.या दरम्यानही समितीच्या सभापतींसह काही सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि ही भेट केवळ नगरसेवकांच्या स्वेच्छाधिकार निधीसाठी असल्याचा दावा करण्यात आला. विशेषत: सभापती हिमगौरी आडके यांनी त्यास माफी नाट्याच्या प्रकाराचा इन्कार केला असून, नगरसेवक निधीवरून चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.माफीनामा: दिनकर पाटील यांचा नकार१२७ नगरसेवक हे सदस्य अत्यंत स्वाभिमानी असून, ते आयुक्त तुकाराम मुंढेच काय, परंतु अन्य कोणाचीदेखील माफी मागणार नाही, असा विश्वास सभागृहनेता दिनकर पाटील यांनी व्यक्त केला आहे. स्थायी समितीचे सदस्य आयुक्तांना भेटले असतील मात्र ते अन्य कामांसाठी माफीसाठी कधीही भेटणार नाही असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. नाशिकमध्ये शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली भाजपा सुनियोजित विकास करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेत आयुक्तांची माफी मागण्याचे नाट्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:44 AM