नाशिक : यंदाची महापालिका निवडणूक प्रचंड दहशतीच्या सावटाखाली होण्याची दाट शक्यता जेलरोड येथील घटनेमुळे समोर आली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीला रक्तरंजित गालबोट लागले असून, गेल्या काही वर्षांपासून फोफावलेल्या टोळ्यांमुळे गुंडगिरीचा मोठा संघर्ष पालिका निवडणुकीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच इच्छुक उमेदवार म्हणून समोर आलेले चेहरे आणि प्रभागातील प्रतिस्पर्धी मोडून काढण्यासाठी सुरू झालेले धमकीसत्र पाहता आगामी काळ निवडणुकीसाठी संघार्षाचा असेल याबाबत मतदारांमध्ये चिंतेचा सूर उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे यंदाची निवडणूक चिंताजनक ठरण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीचे इच्छुक असून, त्यांना शब्दही देण्यात आल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या ‘स्टाइलने’ निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. काहींनी तर प्रतिस्पर्ध्याला धमकाविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. खून, खंडणी, अपहरण, शासकीय कामात हस्तक्षेप, लूटमार आणि चिथावणी देण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि तुरुंगवारी करून आलेल्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्यामुळे यातील काही स्वत:साठी तर काही आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी मैदानात उतरलेले आहेत. विशेष म्हणजे अनेक पक्षांनी अशा इच्छुकांना जवळ केल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रभागांमधील चित्र काय असू शकते, याचा अंदाज पोलिसांनी आताच घेतलेला बरा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जेलरोड येथे शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवाराचा भर चौकात खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे तर नाशिककरांनी आत्ताच धास्ती घेतली आहे. या घटनेनंतर प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या पक्षात सारेच पावन उमेदवार असल्याचा आव आणतीलही, परंतु नाशिककरांना गुन्हगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांविषयी चांगलीच माहिती असून, काही प्रभागात तर गुंडगिरीचा अनुभव नागरिकांना आतापासूनच येत आहे. वरवर पाहता इच्छुकांकडून प्रचार सुरू असल्याचे दिसत असले तरी प्रतिस्पर्धी इच्छुकांना धमकावण्याचे आणि त्यांना निवडणूक न लढण्यासाठी गुंडांकडून दमदाटी करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रकरण कधी कुठवर जाईल याचीच भीती नागरिक आणि पोलीस प्रशासनालाही लागली आहे. गुंडांमुळे राजकीय पक्षांचे वाढते प्राबल्य आणि गुन्हेगारांना मिळणारा राजकीय आश्रय यामुळे गुन्हेगार आणि राजकीय पक्ष यांच्यातील संबंध लपून राहिलेले नाहीत. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून शहरातील टोळीयुद्ध आणि खुनाच्या घटनांचा आलेख पाहता यंदाची निवडणूक कोणत्याही थराला जाण्याची शक्यता शक्यता आहे.
पालिका निवडणुकीवर रक्तरंजित संघर्षाचे सावट
By admin | Published: January 22, 2017 11:13 PM